घरी सोडण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी पीएमपी बस पुरवा; पालिका प्रशासनाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 12:59 PM2020-03-26T12:59:07+5:302020-03-26T13:00:03+5:30
दररोज घरी सोडण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या १० पासून ५० पर्यंत
पुणे : डॉ. नायडू रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये चौदा दिवस राहिल्यानंतर ज्यांचे वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत त्यांना घरी सोडण्यात येत आहे. अशा दररोज घरी सोडण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या १० पासून ५० पर्यंत आहे. या नागरिकांना घरी जाण्यासाठी सद्यस्थितीत वाहन मिळत नाही. त्यांच्यासाठी पीएमपीएमएलने बसची व्यवस्था करावी अशी मागणी पालिका प्रशासनाने पीएमपीएमएलकडे केली आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
ज्या नागरिकांना खोकला, ताप अथवा तत्सम लक्षणे दिसतात असे नागरिक स्वत:हून अथवा डॉक्टरांनी सांगितल्यामुळे डॉ. नायडू रुग्णालयामध्ये नागरिक तपासणीकरिता येत आहेत. ज्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची आवश्यकता नसते अशा रुग्णांना घरीच विलगीकरण करुन ठेवण्यात येते. परंतू, ज्यांना डॉक्टरांच्या प्रत्यक्ष देखरेखीची आणि काही औषधोपचाराची आवश्यकता आहे अशा रुग्णांना नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येते.
या रुग्णांचा चौदा दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांचे नमुने पुन्हा वैद्यकीय तपासणीकरिता पाठविले जातात. हे नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडले जाते. परंतू, सध्या जमावबंदी असून सर्व प्रकारच्या वाहनांना आणि वाहतुकीला बंदी घालण्यात आलेली आहे. या रुग्णांना सोडल्यानंतर त्यांना घरी जाण्याकरिता पीएमपी बस उपलब्ध करुन देण्याची मागणी प्रशासनाने पीएमपीएमएल प्रशासनाकडे केली आहे. त्यावर पीएमपी प्रशासन निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.