विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण द्या
By admin | Published: March 6, 2016 01:06 AM2016-03-06T01:06:54+5:302016-03-06T01:06:54+5:30
‘मेक इन इंडिया’चा अवलंब करताना उद्योगधंद्यांना कौशल्यप्राप्त मनुष्यबळ मिळत नसल्याने शिक्षण संस्थांनी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण दिले पाहिजे
कोरेगाव भीमा : ‘मेक इन इंडिया’चा अवलंब करताना उद्योगधंद्यांना कौशल्यप्राप्त मनुष्यबळ मिळत नसल्याने शिक्षण संस्थांनी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण दिले पाहिजे. त्यातून विद्यार्थ्यांना संधी निर्माण होऊन विकास घडू शकतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
सणसवाडी येथील एका खासगी कारखान्याच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून सणसवाडीतील श्री नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेच्या शालेय इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार बाबूराव पाचर्णे, सरपंच वर्षा कानडे, नरेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ हरगुडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, युवराज दरेकर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, जगाच्या पाठीवर भारताने वेगळा ठसा निर्माण केला आहे. देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. ‘मेक इन इंडिया’मध्ये भारत हा आयात करणारा देश न राहता निर्यात करणारा देश म्हणून नावलौकिकाला यायला हवा. वस्तू भारतातच निर्मिती करून त्यांची परदेशात निर्यात झाल्यास ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने सफल होईल.
सणसवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, सरपंच वर्षा कानडे, उपसरपंच युवराज दरेकर, ग्रामपंचायत सदस्य बाबा दरेकर आदींनी स्वागत केले.