Pune Porsche Car Accident: स्वत:च्या रक्ताचे नमुने दिले; कारमधील मुलांचे असल्याचे भासविले, २ आरोपींना पोलीस कोठडी
By नम्रता फडणीस | Published: August 20, 2024 07:10 PM2024-08-20T19:10:46+5:302024-08-20T19:11:09+5:30
स्वत:च्या रक्ताचे नमुने देऊन ते या अल्पवयीन मुलांचे असल्याचे भासविण्यासाठी कट रचला आणि तपास यंत्रणांची दिशाभूल केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न
पुणे: पोर्शे कार अपघाताच्या घटनेनंतर कारचालक अल्पवयीन मुलासोबत कारच्या मागील सीटवर असलेल्या दोन मित्रांनी देखील मद्यपान केले होते. ते मद्याच्या अंमलाखाली दिसत होते. त्यामुळे , त्यांना वाचविण्यासाठी आरोपी आदित्य सूद आणि आशिष मित्तल याने ससूनच्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर याला लाच दिली, तसेच स्वत:च्या रक्ताचे नमुने देऊन ते या अल्पवयीन मुलांचे असल्याचे भासविण्यासाठी कट रचला आणि तपास यंत्रणांची दिशाभूल केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयाने गुन्हे शाखेने सोमवारी ( दि.१९) अटक केलेल्या दोन्ही आरोपींना २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
कल्याणीनगर अपघाताच्या घटनेवेळी ‘पोर्श’ कारचालक अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये मद्याच्या अंमलाखाली असलेल्या त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने ससूनमध्ये बदलल्याप्रकरणी गुन्हे शाखेने आदित्य अविनाश सूद (वय ५२, रा. सोपान सोसायटी, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) आणि आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. स्काय वेलवेडर सोसायटी, विमाननगर) यांना अटक केली. या प्रकरणातील आरोपींची संख्या ९ झाली आहे. त्यांच्यासोबत रक्ताचे नमुने बदलण्यात सहभाग असलेल्या अरुणसिंग या आणखी एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम २०१ (पुरावा नष्ट करणे) आणि कलम १२० बी (कट रचणे) या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात मंगळवारी या आरोपींना हजर करण्यात आले. होते.
अपघाताच्या घटनेनंतर ‘पोर्श’ कारचालक अल्पवयीन मुलासोबत कारच्या मागील सीटवर बसलेला एक मुलगा सूद यांचा होता. तर दूसरा मुलगा हा फरार आरोपी अरुणसिंग यांचा होता. कारमध्ये मागे बसलेल्या दोन्ही मित्रांनी देखील मद्यपान केले होते. या दोन्ही मुलांना वाचविण्यासाठी आदित्य सूद याने मुलासाठी स्वत:चा तर मित्तल याने फरार अरुणसिंग यांच्या मुलाच्या रक्ताचा नमुना देऊन ते या अल्पवयीन मुलांचे असल्याचे भासविण्यासाठी कट रचला आणि तपास यंत्रणांची दिशाभूल केली. आरोपींना रक्ताचा नमुना बदलण्यासाठी कोणी सांगितले, त्यांनी कोणाच्या मध्यस्थीने व मदतीने हे कृत्य केले, त्यासाठी त्यांनी लाचेच्या स्वरुपात आणखी कोणाशी आर्थिक व्यवहार केला, रक्ताचे नमुने बदलताना ससूनच्या वॉर्ड क्रमांक चाळीसमध्ये आणखी कोण उपस्थित होते, अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे मूळ नमुने त्यांनी नष्ट केले आहेत का, याबाबत तपास करायचा आहे, तसेच आरोपींचे मोबाइल जप्त करून त्याची तांत्रिक तपासणी करायची आहे. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी गणेश इंगळे व अतिरिक्त सरकारी वकील अनिल कुंभार यांनी केली.
मुले साक्षीदार, वडील आरोपी
बचाव पक्षातर्फे अॅड. आबिद मुलाणी , अॅड. सिओल शहा व अॅड.. ध्वनी शहा यांनी बाजू मांडली. अपघाताच्या घटनेवेळी कारमध्ये असलेली दोन्ही मुले सरकार पक्षाची साक्षीदार असून, त्यांचा जबाब आरोपपत्रात नमूद आहे. परंतु, त्यांच्या वडिलांना रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आरोपी केले आहे. या आरोपींचा ‘पोर्श’ कारचालक अल्पवयीन मुलाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आणि कट रचल्याचा आरोप लागू होत नाही. हे दोन्ही आरोप जामीनपात्र व अदखलपात्र आहेत. आरोपींना अटक करताना फौजदारी प्रक्रिया संहिता ४१ ए प्रमाणे नोटीस देण्यात आलेली नाही. आरोपींनी वेळोवेळी पोलिसांकडे जबाब दिले असून, त्यांच्याकडून काहीही जप्त करायचे नाही. गुन्ह्याला तीन महिने उलटल्यावर त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना पोलिस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.