उद्योजक, नागरिकांकडून आॅनलाइन वीजभरणा
By admin | Published: October 25, 2016 06:28 AM2016-10-25T06:28:59+5:302016-10-25T06:28:59+5:30
सध्याच्या घाईगडबडीच्या काळात महावितरणचे बिल भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहणे नागरिकांना नकोसे वाटत आहे. यामुळे आता अनेक नागरिक आॅनलाइन वीजभरणा
पिंपरी : सध्याच्या घाईगडबडीच्या काळात महावितरणचे बिल भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहणे नागरिकांना नकोसे वाटत आहे. यामुळे आता अनेक नागरिक आॅनलाइन वीजभरणा करण्यास प्राधान्य देत आहेत.
शहरात महावितरणचे पिंपरी व भोसरी असे दोन विभाग आहेत. शहरातील १ लाख ३६ हजार २७७ वीजग्राहकांनी सप्टेंबर महिन्यात २३ कोटी १३ लाख रुपयांचा आॅनलाइन वीजबिल भरणा केला. यात पिंपरी विभागात ९१ हजार २५८ ग्राहकांनी १२ कोटी ५३ लाख रुपयांचा आॅनलाइन भरणा केला आहे. पुणे परिमंडलात सर्वाधिक आॅनलाइन भरणा पिंपरी विभागात होत आहे. यासह भोसरी विभागात ४५ हजार १९ वीजग्राहकांनी १० कोटी ६० लाख रुपयांच्या देयकांचा आॅनलाइन भरणा केला आहे.
महावितरणने संकेत स्थळासोबतच मोबाइलधारकांसाठी अॅपद्वारे वीजबिले भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर आॅनलाइन भरणाकडे वीजग्राहकांचा कल वाढत आहे.
आॅनलाइन बिल पेमेंट सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच महावितरणने आॅगस्ट २०१५मध्ये स्मार्ट मोबाइलधारकांसाठी अॅपही उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे वीजग्राहकांना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या संकेतस्थळावर तसेच अॅपवरून वीजबिले भरणा करण्याला ग्राहकांची पसंती वाढली आहे.
महावितरणने ग्राहकांना ईमेलद्वारे वीजबिले प्राप्त करण्याची सोय आहे किंवा छापील बिलांऐवजी केवळ ईमेलद्वारे वीजबिल पाहिजे असल्यास गोग्रीन हा पर्याय उपलब्ध आहे. संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
लांबलचक रांगेतून सुटका
वीजबिल भरायचे म्हटले की, लांबलचक रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. या त्रासापासून वाचण्यासाठी आता आॅनलाइन वीज भरणा करण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांना अधिक सोयीचे होत आहे. महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधेचा नागरिकांनी लाभ घेणे सोपे झाले आहे.