सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलासाठी १३५ कोटी रुपयांची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:08+5:302021-06-10T04:08:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नियोजित केलेल्या राजाराम पूल ते फनटाईम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपुलाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नियोजित केलेल्या राजाराम पूल ते फनटाईम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपुलाच्या कामासाठी १३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे़, अशी माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली़
सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी २ हजार १२० मीटर लांबीचा म्हणजेच दोन किमी अंतरापेक्षा जास्त अंतराचा हा दोन पदरी पूल बांधण्यास पावसाळ्याचा कालावधी सोडून सुमारे ३ वर्षे कालावधी लागणार आहेत. यामध्ये चार पर्याय देण्यात आले असून, राजाराम पूल ते कात्रज बायपास दरम्यान सिंहगडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दोन पदरी एकेरी वाहतुकीसाठी व एकेरी वाहतुकीसाठी फनटाईन थिएटर ते इनामदार चौक असा मार्ग आखण्यात आला आहे़ तसेच, राजाराम पूल चौकात स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दोन पदरी उड्डाणपूल व इंडियन ह्यूम पाईप ते इनामदार चौक दरम्यानच्या उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आले आहे़
---------
चौकट १
हा प्रस्ताव स्थायी समितीने मान्य केला असला, तरी तो महापालिकेच्या मुख्य सभेकडे पुन्हा मान्यतेसाठी जाणार असून, त्यानंतर निविदा प्रक्रिया व पुढील कामकाज होऊन प्रत्यक्षात उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे़ मात्र याला किती कालावधी लागेल हे सध्याच्या कोरोना आपत्तीमुळे निश्चित सांगता येणार नाही़
------------------
चौकट २
महामेट्रोला काम करताना अडचणीचा ठरलेला पुणे विद्यापीठ चौकातील पूल पाडण्याशिवाय पर्याय नसल्याने तो पाडला गेला आहे़ त्यातच आता सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे़ पंरतु, पालकमंत्री अजित पवार यांनी महामेट्रोला खडकवासला ते स्वारगेट दरम्यान मेट्रो प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचा सूचनाही दिल्या असून मेट्रोकडून तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. परिणामी, भविष्यात या पुलामुळे मेट्रोच्या कामाला अडथळा ठरू नये असे नियोजन करणे हे जरूरीचे ठरणार आहे़