प्रथम वर्ष प्रवेशासाठी ‘प्रोव्हिजनल ॲडमिशन’चा विचार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:12 AM2021-06-09T04:12:15+5:302021-06-09T04:12:15+5:30
पुणे : कोरोनामुळे मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे २०२१-२२ हे शैक्षणिक वर्षसुद्धा विस्कळीत होऊ नये, यासाठी राज्य शासनाने प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ...
पुणे : कोरोनामुळे मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे २०२१-२२ हे शैक्षणिक वर्षसुद्धा विस्कळीत होऊ नये, यासाठी राज्य शासनाने प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ‘प्रोव्हिजनल ॲडमिशन’ देण्याचा विचार करावा. तसेच बारावीचा निकाल वाढणार असल्यामुळे राज्य शासनाने व विद्यापीठांनी महाविद्यालयांना तुकडी वाढ किंवा क्षमतावाढ देण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा प्राचार्यांकडून व्यक्त केले जात आहे.
सीबीएसई बोर्डासह राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेसुद्धा इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीचा निकाल अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर होणार असून, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे निकष अद्याप निश्चित झालेले नाहीत. परंतु बारावीचा निकालही शंभर टक्के लागण्याची शक्यता आहे.
बारावीचा निकाल वाढल्यास विद्यापीठ स्तरावरून महाविद्यालयांना प्रत्येक तुकडीत १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढीव प्रवेश करण्यास मान्यता दिली जाते. मात्र, यावर्षी निकालात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे २० टक्के वाढीव प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने मागेल त्याला तुकडी वाढ देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी केली आहे.
----------
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होण्यास उशीर होणार आहे. परिणामी यावर्षीसुद्धा शैक्षणिक वर्ष विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रथम वर्षासाठी ‘प्रोव्हिजनल ॲडमिशन’ देण्याबाबत शासनाने विचार करावा. इयत्ता दहावी व अकरावी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र व बारावीचा परीक्षा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच तुकडी वाढीची प्रक्रिया वेळखाऊपणाची असल्यामुळे विद्यापीठाने एका तुकडीत २० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवेश करण्यास महाविद्यालयांना मान्यता देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.
- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर
-----------
शहरी भागासह ग्रामीण भागातही प्रथम वर्षास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने मागेल त्याला तुकडी वाढ देण्याबाबत निर्णय घ्यावा. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.
- डॉ. संजय चाकणे, प्राचार्य, इंदापूर महाविद्यालय
--------------------------------
इयत्ता बारावीचा निकाल चांगला लागल्यानंतर विद्यापीठाकडून सर्वसाधारणपणे एका तुकडीत १२० विद्यार्थ्यांऐवजी १३२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास महाविद्यालयांना मान्यता दिली जाते. यावर्षी तुकडीत केवळ दहा टक्के क्षमता वाढवून चालणार नाही. त्यामुळे राज्य शासनाने मागेल त्याला तुकडी वाढ देण्याबाबत सकारात्मक विचार करावा.
- डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्राचार्य, के. टी. एच. एम. महाविद्यालय