भावी पोलिसांची तात्पुरती निवड यादी जाहीर, या वेबसाईटवर पाहा 'लीस्ट'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 10:25 PM2022-02-28T22:25:08+5:302022-02-28T22:26:09+5:30
पोलीस उपायुक्त डाॅ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलांतर्गत शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे
पिंपरी : शहर पोलीस दल भरती प्रक्रियेत शिपाई पदाच्या ७२० पैकी ६८६ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व ३६३ पैकी ३५५ उमेदवारांची तात्पुरती प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या www.pcpc.gov.in व www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर या दोन्ही यादी प्रसिद्ध केल्या आहेत.
पोलीस उपायुक्त डाॅ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलांतर्गत शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत लेखी परीक्षा व मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडली. त्यातून निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आदी झाली. त्यात काही उमेदवारांनी गैरप्रकार केल्याने निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे ७२० तात्पुरत्या निवड यादीमधील ३४ उमेदवारांचा व ३६३ तात्पुरत्या प्रतीक्षा यादीमधील आठ उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
...तर निवड होणार रद्द
समान गुण असलेल्या उमेदवारांची निवड शासनाच्या गृह विभागाच्या निर्णयानुसार प्राधान्यक्रमाने करण्यात आली आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेत गैरप्रकार केला होता, असे निष्पन्न झाल्यास संबंधित उमेदवारांची निवड रद्द करण्याचा निर्णय पोलीस भरती समितीने राखून ठेवला आहे, असे उपायुक्त डाॅ. डोळे यांनी सांगितले.