मृत वडिलांच्या अधुऱ्या स्वप्नांसाठी ती बनली पीएसआय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 02:22 AM2019-03-18T02:22:23+5:302019-03-18T02:22:38+5:30
सैन्यदलातून निवृत्त झालेल्या श्रीकांत गायकवाड यांना तिन्ही मुलीच. त्या तिघींपैकी एकीने देशसेवेसाठी आपल्याप्रमाणे सैन्यदलात जावे, अशी त्यांची प्रचंड इच्छा होती
पुणे - सैन्यदलातून निवृत्त झालेल्या श्रीकांत गायकवाड यांना तिन्ही मुलीच. त्या तिघींपैकी एकीने देशसेवेसाठी आपल्याप्रमाणे सैन्यदलात जावे, अशी त्यांची प्रचंड इच्छा! त्यासाठीच त्यांनी तिन्ही मुलींच्या अंगी सैनिकांसारखे धाडस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न सुरू असताना काळाने घाला घातला.
२०१२ मध्ये त्यांचे निधन झाले. मात्र, वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचे जिद्द अंगी बाळगलेल्या सर्वांत धाकट्या मुलीने मात्र त्यांच्यानंतर
पुन्हा तयारी सुरू केली. सैन्यदलात नाही तर किमान देशाच्या अंतर्गत असलेल्या खलनिग्रहणायचे ब्रीद घेऊन वाईटाशी लढणाऱ्या सैन्यात अर्थात पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी जागा निर्माण केली. त्या धाडसी अन् जिद्दी मुलीचे नाव म्हणजे पूजा श्रीकांत गायकवाड.
वडिलांची अधुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी पूजाच्या आई कमल यांनी मोठ्या हिमतीने त्यांना पूजाला पाठबळ दिले. प्रचंड जिद्द, अभ्यासाची चिकाटीच्या जोरावर पूजाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात अनुसूचित जाती प्रवगार्तून प्रथम क्रमांक पटकाविला.
पुण्यातील टिंगरेनगर येथे राहणारी पूजा ही मूळची कुंपरवळण (ता. पुरंदर) गावातली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शालेय
शिक्षण पूर्ण केल्यावर तिने एमएससी बायोटेक केले. लहानपणापासून अभ्यासात हुशार असणा-या
पूजाच्या अभ्यासाची बैठकही कमालीची असल्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिने पहिल्या क्रमांकाने यश मिळविले.
वडिलांच्या मृत्यूनंतर घरात दु:ख आणि प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली असतानाही पूजाने मिळविलेले यश हे अधिक
महत्त्वाचे आहे. त्यामध्ये तिच्या आईचा सिंहाचा वाटा असल्याचे तिने सांगितले.
वडिलांची अधुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आज आईच्या पाठबळावर पोलीस दलात अधिकारी झाले पण ते पाहण्यासाठी वडील हयात नाहीत, याचे फार मोठे दु:ख आहे. पोलीस अधिकारी म्हणून पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार करेन.
-पूजा गायकवाड