MPSC PSI Physical Test: पीएसआय शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर
By प्रशांत बिडवे | Published: May 9, 2024 07:36 PM2024-05-09T19:36:35+5:302024-05-09T19:37:12+5:30
शारीरिक चाचणीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणीत उत्तीर्ण हाेण्यासाठी किमान ६० गुण मिळणे आवश्यक
पुणे : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली हाेती. एमपीएससीतर्फे गुरूवारी दि. ९ राेजी शारीरिक चाचणीसाठी सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पाेलीस मुख्यालय, राेडपाली, सेक्टर-१७, कळंबाेली, नवीन मुंबई येथील मैदानावर येत्या २४ मे ते ६ जून या कालावधीत शारीरिक चाचणीचे आयाेजन करण्यात आले आहे.
आयाेगाने दि. १५ एप्रिल ते २ मे या कालावधीत पाेलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी पुढे ढकलली हाेती. पोलीस महासंचालक कार्यालयाने शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता मैदान, अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करुन देण्याबाबत सहमती दर्शविल्याने एमपीएससीने सुधारित शारीरिक चाचणीचे दि. २४ मे
ते ६ जून २०२४ या कालावधीत आयाेजन केले आहे. शारीरिक चाचणीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणीत उत्तीर्ण हाेण्यासाठी किमान ६० गुण मिळणे आवश्यक आहे. शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे आयाेगाने स्पष्ट केले आहे.