पं. भीमसेन जोशी हा आपला सांस्कृतिक वारसा : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:11 AM2021-02-14T04:11:24+5:302021-02-14T04:11:24+5:30
‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘खयाल यज्ञ’ या संगीत ...
‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘खयाल यज्ञ’ या संगीत महोत्सवास नितीन गडकरी यांनी सदिच्छा भेट दिली. आणि प्रसिद्ध गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या शास्त्रीय गायनाचा आस्वाद घेतला. पुनीत बालन यांनी नितीन गडकरी यांचा सत्कार केला. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, ज्येष्ठ तबलावादक पं. विजय घाटे, गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी, गिरीजा बापट, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, पुनीत बालन,आ. सिध्दार्थ शिरोळे, मेधा कुलकर्णी, गणेश बीडकर, श्रीकांत बडवे, सुप्रिया बडवे, गोविंद बेडेकर, मंजुषा पाटील उपस्थित होते.
गडकरी यांनी सरकार आणि महापालिकांनी अभिजात संगीताचा वारसा पुढे नेण्यासाठी सभागृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत, असे सांगितले.
पंडित भीमसेन जोशी यांनी ख्याल गायकीला मानाचे स्थान मिळवून दिले. तसेच पंडितजींची कारकीर्द देखील पुण्यातच बहरली. या अनुषंगाने ‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने ‘खयाल यज्ञ’ हा महोत्सव आयोजिला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.१२) पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पं. उदय भावळकर यांच्या धृपद गायनाने ‘खयाल यज्ञा’स प्रारंभ झाला. राग तोडी, अहिर भैरवमधील बंदिश भुवनेश कोमकली यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली, तर पं. अजय पोहनकर यांनी राग बसंत बुखारी सादर करून रसिकांना अभिजात गायकीची अनुभूती दिली.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.13) प्रसिद्ध गायिका अश्विनी भिडे -देशपांडे, पंडित डॉ. राम देशपांडे, पं. जयतीर्थ मेवुंडी,सावनी शेंडे-साठे,संदीप रानडे,सौरभ नाईक,ओंकार दादरकर,पंडित रितेश आणि पंडित रजनीश मिश्रा, पद्मा तळवलकर आदी दिग्गज कलाकारांनी रसिकांना सुश्राव्य मैफलीचा आनंद दिला. डॉ.विनिता आपटे, राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
---------------------------------------------------------------------
आज महोत्सवाचा समारोप
रविवारी (दि.१४) महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर -टिकेकर,कलापिनी कोमकली,राहुल देशपांडे,निषाद बाक्रे ,देवकी पंडित,विनय रामदासन,गौतम काळे,रघुनंदन पणशीकर ,मंजुषा पाटील ,पंडित राजन मिश्रा ,पंडित साजन मिश्रा आपली गायनसेवा रुजू करणार आहेत. सकाळी ९.३० वाजता ज्येष्ठ नेते शरद पवार तर सायंकाळी ४.३० वाजता विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे महोत्सवाला भेट देतील.
---------------------------------------------------------------------------------