पं. भास्कर चंदावरकर यांच्या स्मृतींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:09 AM2021-06-21T04:09:19+5:302021-06-21T04:09:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भास्कर चंदावरकर एका भारूड आणि लावणी कार्यक्रमाला गेले होते. ते कलाकार त्यांनी संगीतबद्ध केलेली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भास्कर चंदावरकर एका भारूड आणि लावणी कार्यक्रमाला गेले होते. ते कलाकार त्यांनी संगीतबद्ध केलेली लावणी सादर करत असल्याचा त्यांना मनस्वी आनंद झाला. आज माझे काम खऱ्या अर्थाने तळागाळात पोहोचले. याचे त्यांना समाधान मिळाले, अशा शब्दांत मीना चंदावरकर यांनी पतीच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी नवसह्याद्री येथील त्यांच्या घरासमोरील रस्त्याला ‘पं. भास्कर चंदावरकर पथ’ असे नामकरण करण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
‘पं. भास्कर चंदावरकर पथ’ या नामफलकाचे अनावरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, रोहित चंदावरकर, दीपक पोटे, माधुरी सहस्रबुद्धे, जयंत भावे, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, वीरेंद्र चित्राव आणि पुनीत जोशी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्व अशी होऊन जातात त्यांच्या स्मृती जागृत ठेवायच्या असतात. नगरसेवकांनी हे भान ठेवले पाहिजे की नागरी सुविधांबरोबरच आपण ज्या प्रभागात राहातो तेथील मोठ्या व्यक्तींच्या स्मृती जतन केल्या पाहिजेत. संस्कृती जतन करणे हीच संस्कृती आहे. पंडित भास्कर चंदावरकर यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला त्यांचे नाव देण्याचा कार्यक्रम हा केवळ ते त्या ठिकाणी वास्तव्यास होते म्हणून नव्हे तर त्यांनी या रस्त्यावर वृक्षारोपण केले. शिल्प उभारले व ते या रस्त्याची स्वच्छता देखील करायचे. त्यामुळे या रस्त्याशी त्यांचे असलेले नाते पाहता या रस्त्याला त्यांचे नाव दिले हे खूप चांगले काम केले.
आनंद भाटे म्हणाले की, मला शाळेत असताना भास्कर चंदावरकर यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. त्यांनी व मीनाताईंनी मला गायनासाठी प्रोत्साहन दिले.
मंजूश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले. गायत्री चंदावरकर यांनी आभार मानले.
--------------------------