पं. भीमसेन जोशी यांना सांगीतिक "अभिवादन"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:11 AM2021-02-08T04:11:23+5:302021-02-08T04:11:23+5:30
याआधी पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी गुरुंना स्वरांजली अर्पण केली. त्यांनी ''चंगे नैनवा'' ही बंदिश व ...
याआधी पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी गुरुंना स्वरांजली अर्पण केली. त्यांनी ''चंगे नैनवा'' ही बंदिश व ''आज मोरे मन'' ही द्रृत रचना सादर केली. त्यानंतर त्यांनी पं. भीमसेन जोशी यांवर रचलेली ''अजब निराला'' ही रचना सादर केली. ''मदनाचा पुतळा राजस सुकुमार'' हा अभंग सादर करत गायनाचा समारोप केला. त्यांना पांडुरंग पवार (तबला), गंगाधर शिंदे (संवादिनी), गंभीर महाराज अवचर (पखावज), अक्षय तळेकर, संजय शिगवण (तानपुरा), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली.
सायंकाळच्या सत्रात पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी आणि पतियाळा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी गायनसेवा सादर केली. त्यांनी ‘नैन लगे साजन’ व ‘बहोत दिन बिते’ही बंदिश सादर केली. त्यांनी गौहर जान यांची ‘नान बान जियां मै लागी’ ही ठुमरी पेश केली. ‘सुंदर ते ध्यान’ या अभंगाने गायनाचा समारोप केला. त्यांना ओजस अधिया (तबला), अजय जोगळेकर (संवादिनी), मेघा कुलकर्णी, संघमित्रा सरकार (तानपुरा), माउली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली.
विराज जोशी यांनी ‘धन धन भाग’ व ‘पिया नहीं आयें’, ‘देबरी मौंदर’ या रचना सादर केल्या. ‘बाजें रे पायलियां बाजे’ आणि ‘अणुरेणियां थोकडा’ या भजनाने त्याने गायनाचा समारोप केला. त्याला पांडूरंग पवार (तबला), अविनाश दिघे (संवादिनी), गंभीर महाराज अवचर (पखवाज), रवी पांचाळ, मोहन पवार (तानपुरा) यांनी साथसंगत केली. यानंतर विनोद लव्हेकर यांनी दिग्दर्शित केलेला पं. भीमसेन जोशी यांवरील लघुपट दाखविण्यात आला.
तत्पूर्वी शनिवारच्या सत्रात प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांनी गायनसेवा रुजू केली. त्यांनी ''तू रसकान रे'' व ''रस रसभीनी आज'' या बंदिशी सादर केल्या. त्यानंतर राग कलावती व राग रागेश्री या रागांचा मिश्र राग कलाश्री सादर केला. यामध्ये त''धन धन भाग आज सुहाग'' ही रचना सादर केली. ''देव विठ्ठल, तीर्थ विठ्ठल'' या भजनाने गायनाचा समारोप केला. त्यांना रविंद्र यावगर (तबला), राजीव परांजपे (व्हायोलिन), आशिष रानडे, ललित देशपांडे (तानपुरा), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली. समारोप उस्ताद शाहीद परवेज यांच्या सुरेल सतारवादनाने झाला. त्यांनी राग बागेशी सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना मुकेश जाधव यांनी तबल्यावर साथसंगत केली.