पं. राजन मिश्रा म्हणजे संगीत क्षेत्रातील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:10 AM2021-04-26T04:10:46+5:302021-04-26T04:10:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात ज्येष्ठ गायक पं. राजन-साजन मिश्रा यांचे अतुलनीय योगदान आहे. या ...

Pt. Rajan Mishra is a great personality in the field of music | पं. राजन मिश्रा म्हणजे संगीत क्षेत्रातील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व

पं. राजन मिश्रा म्हणजे संगीत क्षेत्रातील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात ज्येष्ठ गायक पं. राजन-साजन मिश्रा यांचे अतुलनीय योगदान आहे. या गायक बंधूंनी बनारस घराण्याच्या गायकीला वेगळ्या उंचीवर नेले. ठुमरी गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या बनारस घराण्याची गायकी त्यांनी ख्याल गायकी म्हणून जगभरात लोकप्रिय केली. या गायक बंधूमधील पं. राजन मिश्रा हा एक सांगीतिक तारा निखळल्याने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

ज्येष्ठ गायक बंधूपैकी पं. राजन मिश्रा (वय ७०) यांचे रविवारी दिल्लीत कोरोनाने निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व गमावले अशी भावना कलाकारांकडून व्यक्त करण्यात आली. पं. राजन-साजन मिश्रा यांचे पुण्याशी अतूट नाते आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सवापासून अनेक स्वरमहोत्सवात कला सादर करून त्यांनी रसिकांना श्रवणानंद दिलाय. ‘लोकमत ’च्या २०१६ मधील ‘दिवाळी पहाट’मध्ये देखील पं. राजन-साजन मिश्रा यांची ‘स्वरमैफल’ रंगली होती. भारत सरकारच्या वतीने त्यांना ‘पद्मभूषण’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

----

पं. राजन-साजन मिश्रा यांच्या मैफलीला मी तबल्यावर साथसंगत करायचो. गायनाबरोबर तबल्याची साथसंगत कशी असावी ही नजर त्यांनी मला दिली. त्यांनी विनाअट अनेक संस्थांचे कार्यक्रम केले. ते कधीही राग ठरवून गायचे नाहीत. ग्रीन रूममध्ये बसले असताना रसिक त्यांना येऊन पंडितजी आज मारवा सुनना है म्हणायचे. त्यांनी बिहाग राग ठरवलेला असायचा. पण ते लगेचच रसिकांच्या विनंतीला मान द्यायचे. त्याक्षणी आव्हान पेलण्याची ताकद त्यांच्यात होती. मग ‘मारवा’ असे काही अप्रतिम गायचे की मैफल तृप्त व्हायची. ते कधी रसिकांना ‘नाही’ म्हणायचे नाहीत. त्यांनी खूप लोकांसाठी केलयं. त्यांचं तेवढं योगदान होतं. दान करायला पण योग लागतो. असा कलाकार खरंच दुर्मीळ आहे.

- अरविंदकुमार आझाद, प्रसिद्ध तबलावादक

---

बनारस गायकीचा अभ्यास करून ही गायकी आकर्षक आणि वेगळ्या पद्धतीने सादर करणारे पं. राजन मिश्रा यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ठुमरी गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या बनारस घराण्याला ख्याल गायकीमध्ये लोकप्रिय करण्याचे श्रेय मिश्रा बंधू यांच्याकडे जाते. मनमिळाऊ स्वभावाने ते प्रत्येकाला जिंकून घेत असतं.

- पं. उल्हास कशाळकर, ज्येष्ठ गायक

---

पं. राजन मिश्रा यांच्यासारखा ॠषीतुल्य गायक आपल्यातून गेला याचं वाईट वाटत आहे. त्यांचे काका सारंगीवादक पं. गोपाल मिश्रा यांच्यापासून ते पं. राजन-साजन मिश्रा यांचे पं. भीमसेन जोशी यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे त्यांचे आमच्या कुटुंबाशी वेगळे स्नेहबंध होते. बनारस घराण्याची गायकी त्यांनी शुद्ध रसाने आणि रंजक पद्धतीने रसिकांसमोर मांडली आणि ती गायकी रसिकाभिमुख केली. ते एक दिलखुलास व्यक्तत्त्व होते. -श्रीनिवास जोशी, कार्याध्यक्ष, आर्य संगीत प्रसारक मंडळ

----

विद्वानांपासून ते सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने बनारस घराण्याची गायकी सादर करण्यामध्ये पं. राजन-साजन मिश्रा यांचे सामर्थ्य होते. पं. राजन मिश्रा यांची आलापी भावपूर्ण असायची. दोन व्यक्ती पण आत्मा एक अशा पद्धतीने ते गायन सादर करीत असत.

-डॉ. मोहनकुमार दरेकर, प्रसिद्ध गायक

Web Title: Pt. Rajan Mishra is a great personality in the field of music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.