पुण्यातील पबचालकांचे राजकीय व्यक्तींशी घनिष्ठ संबंध; कारवाईस टाळाटाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 08:25 AM2024-05-23T08:25:48+5:302024-05-23T08:26:39+5:30
हे पबचालक बिनधास्त सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांचा धंदा चालवत होते. यांच्यावर एक्साईज असो अथवा पोलिस प्रशासन कारवाई करण्यास धजत नव्हते. याचे प्रमुख कारण या पब चालक-मालकांचे राजकीय व्यक्तींसोबत असलेले घनिष्ठ संबंध हे आहे....
पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आज पब आणि ड्रग्जचे शहर म्हणून देशभर झाली आहे. आधी ललित पाटील आणि आता धनाढ्य बिल्डर विशाल अग्रवाल याच्या बाळाचा प्रताप, यामुळे शहरातील सर्वसामान्यांचे जीवनदेखील ढवळून निघाले आहे. आधी शांत आणि सुसंस्कृत म्हणून ओळखले जाणारे शहर आज पबच्या आवाजात हरवले आहे. शहरातील कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, विमान नगर, बालेवाडी हायस्ट्रीट या परिसरात बहुसंख्येने पब आहेत. हे पबचालक बिनधास्त सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांचा धंदा चालवत होते. यांच्यावर एक्साईज असो अथवा पोलिस प्रशासन कारवाई करण्यास धजत नव्हते. याचे प्रमुख कारण या पब चालक-मालकांचे राजकीय व्यक्तींसोबत असलेले घनिष्ठ संबंध हे आहे.
शहरातील सर्वच पब हे धनाढ्य लोकांचे अथवा त्यांच्या पाल्यांचे आहेत. शहरातील पबचे पार्टनरसुद्धा नामवंत खेळाडू, अभिनेते असल्याने युवकांमध्ये त्याची क्रेझ आहे. पब चालक-मालकांपैकी जवळपास प्रत्येकाच्याच सोशल मीडिया अकाऊंट, व्हॉट्सॲप डीपीवर राजकारण्यांसोबतचे फोटो आहेत. यासह पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबतदेखील यांचे फोटो असल्याने ‘आमचे कोणी वाकडे करू शकत नाही, आम्ही आमच्या मनाप्रमाणेच वागणार’ असा बोध इतरांना होत होता. कल्याणी नगर येथील बड्या बापाच्या बाळाने दारूच्या नशेत दाेघांना मारले. त्यानंतर शहरातील हे पब कल्चर कसे धोकादायक आहे, हे पुढे आले.
त्यानंतर पोलिस प्रशासन आणि महापालिका यांनी या पबवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, इतके दिवस कुणालाच यावर कारवाई करण्यासाठी सुचले नाही? इतके दिवस या पब चालक-मालकांसोबत फोटो काढण्याआधी ही मंडळी जो व्यवसाय करत आहे, त्या व्यवसायात अनेक नियमांची मोडतोड केली जात आहे हे का लक्षात आले नाही? की, हे सगळे माहीत असूनही स्वत:च्या किरकोळ फायद्यासाठी ही मंडळी या लोकांना पाठीशी घालत होती? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
राजकीय मंडळींना सावध होण्याची वेळ...
आज सर्वसामान्य माणूस शहाणा झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे कोणतीच बाब लपून राहत नाही. आम्ही फक्त सोबत फोटो काढला, पण त्याला ओळखत नाही, असा दावा आता चालणार नाही. कारण, एखाद्यासोबत एका व्यक्तीचा एखादा फोटो ही बाब पटण्यासारखी असते. मात्र, अनेकदा अशा व्यक्तींसोबतचे फोटो, परिवारातील सदस्यांचे फोटो ही बाब न पटणारी आहे. याशिवाय काही पब चालक-मंडळी तर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी अथवा नोंदणीकृत सदस्य असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजकीय मंडळी आणि आएएस-आयपीएस व अन्य अधिकाऱ्यांनी सावध होण्याची वेळ नक्कीच आली आहे.