बालमजूरी विराेधी सप्ताहातून करण्यात येणार जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 06:37 PM2018-06-12T18:37:41+5:302018-06-12T18:37:41+5:30
चाैदा वर्षाखालील मुलांना बालमजुरीतून मुक्त करण्यासाठी बालमजूरी विराेधी सप्ताह राबविण्यात येणार असून त्या माध्यमातून नागरिकांमध्ये बाल व किशाेरवयीन कामगार प्रतिबंध अाणि नियमन कायद्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
पुणे : चाैदा वर्षाखालील मुलांना बालमजुरीतून मुक्त करण्यासाठी बालमजूरी विराेधी सप्ताह राबविण्यात येणार असून त्या माध्यमातून नागरिकांमध्ये बाल व किशाेरवयीन कामगार प्रतिबंध अाणि नियमन कायद्याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती कामगार उप अायुक्त व्ही. सी. पनवेलकर यांनी लाेकमतशी बाेलताना दिली. बालकांच्या विकासासाठी त्यांना कामाला जुंपणे हा कायद्याने गुन्हा आहे़ मात्र, पुण्यातील १३ ते १७ वयोगटातील ६४ टक्के मुलांना असा काही बालकामगार कायदा अस्तित्वात आहे, याची काहीही माहिती नसल्याचे एका सर्वेक्षणातून नुकताच पुढे आले आहे. त्यामुळे या मुलांमध्ये जागृती करण्यासाठी हा सप्ताह महत्त्वाचा ठरणार अाहे.
जागतिक बालमजूरी विराेधी दिनानिमित्त पुण्यातील अपर कामगार अायुक्तालयात कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. यावेळी विविध सामाजिक संस्थांनी बालमजूरीतून सुटका केलेल्या मुलांना शालेय अभ्यासासाठी वह्यांचे वाटप करण्यात अाले. तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी बालमजूरी करणाऱ्या मुलांबाबतचे अापले अनुभव कथन केले.
पनवेलकर म्हणाले, 12 जून पासून बालमजूरी विराेधी सप्ताह राबविण्यात येताे. या सप्ताहामध्ये नागरिकांमध्ये, तसेच व्यावसायिकांमध्ये लहान मुलांना कामास ठेवू नये, कामास ठेवल्यास हाेणारा दंड तसेच हाेणारी शिक्षा याबद्दल जनजागृती करण्यात येते. तसेच विविध ठिकाणी धाडी टाकून बालमजूरी करणाऱ्या मुलांची सुटका करण्यात येते. बाल व किशाेरवयीन कामगार प्रतिबंध अाणि नियमन कायद्यातील 2016 च्या नवीन तरतुदीनुसार 14 वर्षाखालील सर्व मुलांना बालमजूरी करण्यास भाग पाडणे हा गुन्हा अाहे. तसेच 14 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना धाेकादायक कामास लावणे हाही या कायद्यानुसार गुन्हा अाहे. त्याचबराेबर 14 वर्षावरील मुलांना नियमित शिक्षण देणे अावश्यक अाहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला 20 ते 50 हजार रुपयांचा दंड करण्यात येताे. तसेच 1 ते 3 वर्षापर्यंतची शिक्षा सुद्धा हाेऊ शकते. त्याच व्यक्तीने दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास त्याला थेट शिक्षा केली जाते. लहान मुलगा दुसऱ्यांदा बालमजूरी करताना अाढळल्यास त्याच्या पालकांनाही दंड अाकारण्याची तरतूद या कायद्यात करण्यात अाली अाहे.
2011 साली केलेल्या सर्वेनुसार 14 वर्षाखालील 22 हजार 726 बालमजूर हाेते. त्यानंतर सर्वे करण्यात अाला नसल्याने हा अाकडा वाढण्याची शक्यता अाहे. येत्या काळात यशदा मार्फत बालमजूरी करणाऱ्या मुलांचा सर्वे करण्यात येणार अाहे. या कार्यक्रमात बालमजूरी प्रथेविराेधी शपथही घेण्यात अाली.