नारायणगाव, वारूळवाडीत जनता कर्फ्यू, सर्व दुकाने बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:10 AM2021-05-26T04:10:15+5:302021-05-26T04:10:15+5:30
नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नारायणगाव व वारूळवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, रुग्णसंख्या लक्षात घेऊन नारायणगाव ...
नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नारायणगाव व वारूळवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, रुग्णसंख्या लक्षात घेऊन नारायणगाव पोलीस स्टेशन येथे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, व्यापारी असोसिएशन, प्रतिष्ठित नागरिक यांची सोमवारी (दि. २४) रोजी बैठक पार पडली. या बैठकीला सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, नारायणगाव सरपंच योगेश पाटे, वारूळवाडी राजेंद्र मेहेर, किराणा असोसिएशनचे मनोज भळगट, हॉटेल व्यावसायिक संजय वारुळे, नारायणगाव ॲग्रीकल्चर डीलर असोसिएशनचे अध्यक्ष अजित वाजगे, सुनील बडेरा, विपुल फुलसुंदर, जंगल कोल्हे, मोहनीश दळवी, राजेंद्र वाजगे, संतोष विटे, रितेश शेळके आदी उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही गावांमध्ये गेल्या महिन्याभरात २ पेक्षा जास्त कोरोना रुग्ण एकाच कुटुंबात आढळून येत आहेत. रुग्ण व नागरिकांनी योग्य ती काळजी न घेतल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने किराणा व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते, खत-औषधे विक्रेते, हॉटेल व्यावसायिक यांच्या संमतीने पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला. या जनता कर्फ्यूमध्ये हॉस्पिटल, बँक, मेडिकल व दूधडेअरी वगळता सर्व व्यावसायिक दुकाने बंद राहणार आहेत.
परिसरातील सर्व नागरिकांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ५ दिवस कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी केले आहे.