बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा पुण्यात रविवारी जाहीर मेळावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 08:04 PM2022-12-02T20:04:41+5:302022-12-02T20:06:56+5:30
या मेळाव्यात कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेश दिला जाणार आहे...
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून येत्या रविवारी (दि. ४) भवानीपेठ येथील महात्मा जोतिबा फुले शाळेच्या मैदानावर जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेश दिला जाणार आहे.
खासदार श्रीकांत शिंदे या जाहीर मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. विधिमंडळाचे प्रतोद भरत गोगावले, माजी खासदार शिवाजीराव आढळाराव पाटील, विजय शिवतारे, नरेश म्हस्के, खासदर श्रीरंग बारणे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी पत्रकार परिषदेत ही दिली.
जिल्हा संपर्क प्रमुख अजय भोसले, युवासेना सचिव किरण साळी आदी उपस्थित होते. या मेळाव्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील कार्यकर्तेही बाळासाहेंबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असून त्यामुळे अगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे, असेही नाना भानगिरे यांनी सांगितले.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारने केला आहे. अशाच पध्दतीचे काम पक्षाच्या माध्यमातून पुण्यातही सुरू असून पुणेकरांच्या वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये स्वत: मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत, असे भानगिरे यांनी सांगितले.