राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 02:05 PM2022-07-31T14:05:50+5:302022-07-31T14:22:06+5:30
पोलीस व शिवसैनिक यांच्यात काही काळ शाब्दिक चकमक
पौड : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा मुळशी तालुका शिवसेनेच्या वतीने घोटावडे फाटा येथे आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी कोश्यारी यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु कोश्यारी पद हे घटनात्मक पद असल्याने त्यांच्या प्रतिमेचा आपण अवमान करू शकत नाही अशी पौड पोलिसांनी आंदोलकाना समज देऊन प्रतिमेचा अवमान करण्यापासून रोखले.
यावेळी शिवसेनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसैनिकांनी तीव्र शब्दात कोश्यारी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, तालुका प्रमुख सचिन खैरे, जि. प.सदस्य शंकर मांडेकर,भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, माजी सभापती भानुदास पानसरे यांनी मनोगते व्यक्त केली. सहकार आघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आंदोलनामुळे काही काळ वाहतूक वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत वाहतूक पूर्ववत केली.
पोलीस व शिवसैनिक यांच्यात काही काळ शाब्दिक चकमकही झाली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड यांच्या मागदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी बोलताना बाळासाहेब चांदेरे म्हणाले की, कोश्यारी यांनी सुरुवातीपासून महाराष्ट्रात कायम भांडणे लावायचेच काम केले. कोश्यारी हे भाजपा धार्जिणे धोरण स्विकारून काम करीत आहेत. त्यामुळेच कोश्यारी यांच्या विरोधात शिवसेनेने उठवलेला आवाज दाबण्यासाठीच संजय राऊत यांच्या घरी ईडीने छापा टाकला आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव आहे. त्यामुळेच कोश्यारी हे अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य करीत आहेत.