कामास अडथळा ठरणारे जनसंपर्क कार्यालय पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:21 AM2021-03-13T04:21:54+5:302021-03-13T04:21:54+5:30
दत्तनगर ते शनिनगर जांभूळवाडी रस्ता हा प्रचंड रहदारीचा असून येथे मोठ्या प्रमाणात कष्टकरी व कामगार वर्ग राहतो. त्यातच या ...
दत्तनगर ते शनिनगर जांभूळवाडी रस्ता हा प्रचंड रहदारीचा असून येथे मोठ्या प्रमाणात कष्टकरी व कामगार वर्ग राहतो. त्यातच या रहदारीच्या रस्त्यावर नेहमीच वाहतूककोंडी होत असते. सर्व सामान्यांंना या वाहतूककोंडीच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी नगरसेविका स्मिता कोंढरे प्रयत्नशील होत्या. मागील काही दिवसांपासून या संदर्भात त्यांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
विकास निधीतून तब्बल तीन कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाले आणि कामाला प्रत्यक्ष सुरुवातसुद्धा झाली. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे काढणे, अडथळा ठरणाऱ्या मिळकती तसेच अतिक्रमित धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या तर रोहित्रांच्या स्थलांतरणाचे काम वेगाने सुरू झाले. या दरम्यान काही नागरिकांची नाराजी पाहता नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणारे स्वतःचे जनसंपर्क कार्यालय स्वतःहून पाडत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
चौकट - रस्ता रुंदीकरणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता, अखेर सातत्यपूर्ण पाठपुराव्याने रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आणि रुंदीकरणास अडथळा ठरणारे माझे जनसंपर्क कार्यालय मी स्वतः पाडून विकासकामाला सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करत आहे. - नगरसेविका, स्मिता कोंढरे
फोटो ओळ - दत्तनगर-जांभूळवाडी मुख्य रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणारे स्वतःचे जनसंपर्क कार्यालय नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी स्वतः पाडले.