खासगी टँकरचालकांकडून जनतेची लूट
By admin | Published: March 26, 2016 03:14 AM2016-03-26T03:14:37+5:302016-03-26T03:14:37+5:30
पाणीटंचाईचा समस्त पुणेकर मुकाटपणे सामना करीत असताना काही टँकरचालक मात्र पुणेकर नागरिकांची पाण्याची गरज भागविताना स्वत:चा खिसा गरम करून घेत आहे.
पुणे : पाणीटंचाईचा समस्त पुणेकर मुकाटपणे सामना करीत असताना काही टँकरचालक मात्र पुणेकर नागरिकांची पाण्याची गरज भागविताना स्वत:चा खिसा गरम करून घेत आहे. यातील काहीजणांना नगरसेवकांचाही आशीर्वाद असून, प्रामुख्याने उपनगरांमध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. बाटलीबंद शुद्ध पाणी पुरविणाऱ्या काही कंपन्याही यातून फार मोठा फायदा करून घेत आहेत.
पालिकेकडून नागरिकांसाठी म्हणून स्वस्त दरात पाणी घ्यायचे व नागरिकांना मात्र ते दुप्पट दरात विकायचे, असा प्रकार सुरू आहे. सर्व उपनगरांमध्ये मिळून सध्या ५००पेक्षा अधिक टँकर पाणी पुरविण्यासाठी म्हणून वापरले जात आहेत. येत्या दोन महिन्यांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. ज्या परिसराला पाणी मिळत नाही, तिथे टँकरद्वारे पाणी पुरविण्याचा पालिकेचा प्रयत्न असतो. हे पाणी विनामूल्य पुरविले जाते; मात्र ते कमी पडते. त्यामुळे सोसायट्या, तसेच खासगी बंगले पालिकेत पैसे जमा करून टँकर मागवतात. पालिकेकडे स्वत:च्या टँकरची संख्या कमी आहे. त्यामुळे निविदा पद्धतीने टँकर घेतले जातात व त्यांना पाणी पुरविण्याचा परवाना दिला जातो. याशिवाय काही खासगी टँकरचालक आहेत. त्यांनाही पालिका पैसे आकारून टँकर भरू देते. त्यांनी थोडे पैसे जास्तीचे आकारून या पाण्याची विक्री करणे अपेक्षित आहे. टँकरने पाणी पुरविण्याच्या या सगळ्याच पद्धतीत अंदाधुंदी कारभार सुरू आहे. त्यातून खासगी टँकर- माफिया उदयाला येत आहेत.
पालिकेचे पाण्याचे दर ठरलेले आहेत. यात टँकरचे भाडे गृहीत धरलेले आहे. याच दराने पाणी देणे टँकरचालकांना बंधनकारक आहे. प्रत्यक्षात मात्र टँकरचालकांकडून नागरिकांची लूटच केली
जात आहे.
१० हजार लिटरचा टँकर पालिकेकडून टँकरचालकाला फक्त ५०० रुपयांमध्ये भरून मिळतो. तो त्याने इंधन दर गृहीत धरून ८५० रुपयांना विकणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र हजार ते पंधराशे रुपये, असा दर लावला जातो. एका टँकरचालकाने दिवसभरात किती वेळा टँकर भरून घ्यायचा, याचे काही बंधन नाही, त्यामुळे पालिकेच्या काही जलशुद्धीकरण केंद्रांवर विशिष्ट टँकरचालकांची मक्तेदारी निर्माण झाली आहे.
बाटलीबंद शुद्ध पाणी पुरविणाऱ्या काही कंपन्यांनाही पाण्याचे टँकर काही चालकांकडून पुरविले जातात. थेट पालिकेकडून व्यावसायिक दराने असे पाणी घेणे त्यांना परवडते. त्यातही पाणीटंचाईमुळे सध्या अशा प्रकल्पांवर पालिकेची वक्रदृष्टी आहे. त्यामुळे असे बेकायदेशीर पद्धतीने पाणी घेऊन त्यांच्याकडून प्रकल्प चालविले जात आहे.
नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी कंपन्यांच्या नावपत्त्यासहित असे प्रकार थेट स्थायी समितीत आयुक्तांच्या समोर उघड करून दाखविल्यानंतरही हे प्रकार खुलेआम सुरू आहेत. पालिकेच्या केंद्रातून पाणी घेऊन जाणाऱ्या टँकरचा माग राहावा, यासाठी त्यावर जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही टँकर्सना अशी यंत्रणा बसविण्यात आली; मात्र त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही.
पाण्याच्या टँकरविक्रीत गैरव्यवहार होत असल्याबाबत फक्त ओरड केली जाते; मात्र नावे दिली जात नाही. आमचे नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी ज्या टँकरचालकाने त्यांना जादा दराने पाणी विक्री केली, त्या टँकरचा क्रमांक आमच्याकडे कळवावा, त्यावर कारवाई केली जाईल.
- विजय कुलकर्णी, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग