सुधीर फडकेंच्या आयुष्यावरील पुस्तकाचे आज प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:10 AM2021-07-25T04:10:59+5:302021-07-25T04:10:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठी संगीताला पडलेले सुरेल स्वप्न अशी जनमानसात ख्याती असलेल्या सुधीर फडके ऊर्फ बाबूजींची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मराठी संगीताला पडलेले सुरेल स्वप्न अशी जनमानसात ख्याती असलेल्या सुधीर फडके ऊर्फ बाबूजींची रविवारी (दि.२५) १०२ वी जयंती. पन्नास वर्षांहून अधिक काळ मराठी चित्रपटसृष्टीसह सुगम संगीतामध्ये अधिराज्य गाजविणा-या या प्रतिभावंत संगीतकाराने ‘गीतरामायण’ सारखी एक अजरामर सांगीतिक अनुभूती रसिकांना दिली. बाबुजींच्या या शतकोत्तर जयंतीचे औचित्य साधून लेखक -दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी 'देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई' हे बाबूजींच्या सुरेल कृष्णधवल काळाचा वेध घेणारे पुस्तक वाचकांच्या भेटीला आणले आहे. विशेष म्हणजे, लेखक आणि चित्रकार अशी दुहेरी भूमिका बजावत देशपांडे यांनी ३० हून अधिक रेखाचित्रे पुस्तकात रेखाटली आहेत.
बाबुजींच्या जीवनप्रवासाचा घेतलेला शोध, काही वैयक्तिक आठवणी, काही प्रासंगिक घटना विविध कार्यक्रमानिमित्त भेटलेल्या दिग्गज लोकांकडून संकलित केलेले अनुभव, यांचे लघुकथा स्वरूपातील हे आकर्षक पुस्तक देशपांडे यांनी निर्मित केले आहे. या पुस्तकाविषयी सांगताना योगेश देशपांडे म्हणाले,'हे पुस्तक करण्यासाठी प्रेरणा मिळाली ती दोन घटनांच्या निमित्ताने . एक म्हणजे त्यांच्या ' सावरकर' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी बाबुजींची प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर आलेला 1998 सालचा अनुभव, आणि मी स्वत: 2016 साली भारतीय सैन्यातील जायबंदी जवानांसाठी जाहिरात मोहीम करीत असताना जाणवलेली देशभक्तीची अनेक रूपे. या निमित्ताने गायक संगीतकार म्हणून आवडणारे सुधीर फडके, निस्सीम देशभक्त म्हणून अधिक खुणावत गेले. 'बाबूजींच्या जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगाना लिहिताना मी माझ्या नजरेतून ते पाहात होतो. कारण माझ्या व्यक्त होण्याला चित्ररुपी प्रभावी माध्यम हातात होतं. म्हणूनच कि काय बाबूजींचे सर्व प्रसंग मला प्रत्यक्ष जगायला मिळत होते. त्यामुळे स्वरगंधर्व सुधीर फडके यांचा चरित्रचित्र शोधण्याचा हा अनुभव ख-या अर्थाने त्यावरील रेखाचित्र काढली तेव्हा गडदपणे जाणवला.
---------------------------------