मर्म अभंगांचे पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:00+5:302021-07-01T04:10:00+5:30
पुणे : प्रा. प्रभाकर श्रीनिवास पंडित लिखित ‘मर्म अभंगांचे’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार यांच्याहस्ते ...
पुणे : प्रा. प्रभाकर श्रीनिवास पंडित लिखित ‘मर्म अभंगांचे’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार यांच्याहस्ते ऑनलाईन पार पडला.
महाराष्ट्रातील विविध संतांच्या अभंगांचे अर्थासहित केलेले सर्वांगसुंदर निरूपण वाचकांना सर्वार्थाने वैचारिक आनंद प्राप्त करून देईल. संत साहित्यात हा ग्रंथ निश्चितपणे मैलाचा दगड ठरेल. कारण पंडित यांनी निरूपण केलेल्या प्रत्येक अभंगातील तत्त्वदर्शन अतिशय सोप्या भाषेत उलगडून दाखविले असल्याचे पोतदार यांनी सांगितले.
आजच्या यांत्रिक युगात प्रापंचिक सुख मिळवायचे असेल तर संत साहित्याचे वचन आणि अभंग, चिंतन याशिवाय दुसरा मार्ग नाही असे विचार लेखक पंडित यांनी मनोगतातून मांडले. याप्रसंगी ह.भ.प. भारत वेदपाठक, प्रा. एल.बी.पाटील, अजित पाटील, चंद्रकांत पंडित, कल्याण पानगे, दिगंबर भोर, योगी प्रकाश पोतदार, मकरंद दीक्षित यांची भाषणे झाली.
प्रसाद दीक्षित, प्रकाशिका प्रणाली पंडित, डॉ. रवींद्र वेदपाठक, श्यामला पंडित, कविराज विजय सातपुते यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.