मोपलवारांच्या चौकशीचा अहवाल प्रसिद्ध करावा; सजग नागरिक मंचाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 03:03 PM2017-12-28T15:03:14+5:302017-12-28T15:07:35+5:30
राधेश्याम मोपलवार यांची शासनाने जी चौकशी करुन क्लीनचीट दिली, तो अहवाल महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पुणे : राधेश्याम मोपलवार यांची शासनाने जी चौकशी करुन क्लीनचीट दिली, तो अहवाल महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे़ माहिती अधिकार कायद्यान्वये असा अहवाल प्रसिद्ध करणे शासनावर बंधनकारक असल्याची आठवण मुख्यमंत्र्यांना करुन देण्यात आली आहे़
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची उभारणी एमएसआरडीसी करीत असून, त्याची सूत्रेही मोपलवार यांच्याकडे होती. विधिमंडळाच्या यावर्षीच्या पावसाळी अधिवेशनात मोपलवार यांच्यावर काही आरोप करण्यात आले आणि त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने क्लीन चिट दिल्यानंतर राधेश्याम मोपलवार यांना राज्य रस्ते महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी राज्य शासनाने मंगळवारी फेरनियुक्त केले आहे़
याबाबत सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे़ माहिती अधिकार कायदा २००५ च्या कलम ४ क अन्वये आपणास तीन सदस्य असलेल्या समितीने दिलेला अहवाल महाराष्ट्र राज्याच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे़ त्यामुळे आपण पारदर्शक कारभार व कायद्याचा मान राखत हा चौकशी अहवाल तातडीने महाराष्ट्र राज्याच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करावा़, असे या पत्रात म्हटले आहे़