व्यावसायिक अभ्यासक्रमाचे सुधारित वेळापत्रक प्रसिध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:14 AM2021-01-19T04:14:37+5:302021-01-19T04:14:37+5:30
पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणा-या अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर यांसह विविध पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रमांच्या ...
पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणा-या अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर यांसह विविध पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक प्रसिध्द केले आहे. त्यामुळे सर्वच अभ्यासक्रमांच्या दुस-या फेरीतील रिक्त जागांची यादी येत्या 21 जानेवारी रोजी प्रसिध्द केली जाईल. तसेच सर्व महाविद्यालये त्याच दिवशी सुरू होतील, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.
सीईटी सेलतर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, मराठा आरक्षणस स्थगिती मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना खुला गटातून किंवा इडब्ल्यूएस प्रवगार्तून प्रवेश घ्यावा लागला. मात्र, पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कागदपत्र जमा करताना अनेक समस्यांना समोरे जावे लागले.त्यामुळे कागदपत्र सादर करण्यास मुदतवाढ द्यावी,अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी सीईटी-सेलकडे केली. त्यानुसार येत्या २० जानेवारीपर्यंत कागदपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली.
विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र, इडब्ल्यूएस प्रमाणपत्र, सीव्हीसी आदी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ दिल्यामुळे दुस-या प्रवेश फेरीच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला असून प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक सीईटी-सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------
- अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट,या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीचे तसेच एमसीएस - एमटेक आदी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाची शेवटची तारीख २० जानेवारी आहे.
- दुस-या फेरीतील रिक्त जागांची यादी २१ जानेवारी प्रसिध्द होईल.
- दुस-या फेरीतील जागा वाटपाची प्रक्रिया २४ ते २६ जानेवारी या कालावधीत होईल तर या फेरीतील प्रवेश निश्चिती २५ ते ३० जानेवारीपर्यंत केली जाणार आहे.