प्रकाशकांची पुस्तके रेल्वेतून
By admin | Published: December 28, 2014 12:10 AM2014-12-28T00:10:17+5:302014-12-28T00:10:17+5:30
प्रकाशक साहित्य व्यवहारातील महत्त्वपूर्ण कडी आहे. साहित्यिकांचे लेखन वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य प्रकाशक करतात.
पुणे : प्रकाशक साहित्य व्यवहारातील महत्त्वपूर्ण कडी आहे. साहित्यिकांचे लेखन वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य प्रकाशक करतात. घुमानच्या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होण्याची इच्छा अनेक प्रकाशकांनी व्यक्त केली असून, प्रकाशकांना पुस्तके नेण्यासाठी रेल्वेमध्ये विशेष सोय करण्यात येणार आहे. यामुळे प्रकाशकांचा पुस्तके नेण्या-आणण्याचा प्रश्न सुटणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
घुमानला साहित्य संमेलनाची घोषणा झाल्यानंतर साहित्यवर्तुळातूनच नव्हे, तर प्रकाशकांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पंजाबमध्ये मराठी भाषिकांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे महोत्सवातील ग्रंथप्रदर्शनात पुस्तकांची विक्री होणार नाही. एवढ्या लांब पुस्तके कशी नेणार, असा प्रश्न उपस्थित करून संमेलनालाच न जाण्याचा निर्णय प्रकाशकांनी घेतला होता.
याविषयी देसडला म्हणाले, ‘‘प्रकाशकांचा मुद्दा चुकीचा नसला तरी साहित्य संमेलन हे सर्वसमावेशक व्हावे, अशी साहित्य महामंडळ आणि आयोजक म्हणून आमची भूमिका आहे.
या संदर्भात प्रकाशकांकडून प्रस्ताव मागविले असून, त्यावर संमेलनापूर्वी निश्चित तोडगा निघेल.’’ ते म्हणाले, सध्या तरी घुमानला जाण्यासाठी पुणे ते अमृतसर आणि नाशिक ते अमृतसर या भागातून दोन रेल्वेसाठी प्रशासंकाडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यातच प्रकाशकांच्या पुस्तकांची सोय करता येणार आहे.’’ (प्रतिनिधी)
४संतपरंपरेच्या पंक्तीमधील संत नामदेव यांचे पंजाब-महाराष्ट्रातील योगदान तसेच मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने होणारे सकारात्मक प्रयत्न या विषयावरील विशेष लेखांनी घुमानच्या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकांची पाने सजणार आहेत. यामध्ये मराठी भाषा धोरण व शासन, मराठी भाषा व देवनागरी मुद्रण, भाषेचे संगणकीकरण आदी विषयांचा समावेश आहे. ही स्मरणिका संग्रही ठेवावी अशीच असेल, असा विश्वासही देसडला यांनी व्यक्त केला.
१ संत नामदेव हे महाराष्ट्र आणि पंजाबला जोडणारा ऐतिहासिक दुवा आहेत. महाराष्ट्र आणि साहित्य संमेलनाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असे घुमानचे संमेलन होईल, असा आमचा विश्वास आहे.
२ केवळ महाराष्ट्र किंवा देशभरातील मराठी भाषिकच नव्हे, तर पाकिस्तानसह युरोप आणि इस्त्रायल आदी ठिकाणांहूनही मराठी लोकांनी संमेलनाला येण्याची इच्छा कळविली आहे.
४ संमेलनाला खूप भरघोस प्रतिसाद मिळत आहे. संमेलनाच्या निमित्ताने पंजाबमधील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विशेष पॅकेजेसही जाहीर करण्यात आली आहेत. हे राष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे आणि घुमानला राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देसडला म्हणाले.