प्रकाशकांचा विरोध मावळला
By Admin | Published: February 11, 2015 01:06 AM2015-02-11T01:06:56+5:302015-02-11T01:06:56+5:30
घुमानला मराठी भाषिकांची संख्या कमी असल्याने पुस्तकांची विक्री होणार नाही, या भूमिकेवर ठाम राहून इतर प्रकाशक संमेलनाला गेले
पुणे : घुमानला मराठी भाषिकांची संख्या कमी असल्याने पुस्तकांची विक्री होणार नाही, या भूमिकेवर ठाम राहून इतर प्रकाशक संमेलनाला गेले तर व्यावसायिक संबंध संपुष्टात येतील असा इशारा देत बहिष्काराचे शस्त्र उगारणाऱ्या राज्य मराठी प्रकाशक परिषदेने अखेर साहित्य महामंडळाशी चर्चेची कवाडे खुली केली.
चर्चेनंतर अखेर आपली ‘जहाल’ भूमिका ‘मवाळ’ करीत संमेलनाला असलेला विरोध आता मावळल्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यामुळे प्रकाशक आणि महामंडळ यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्याला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागण्यांवर महामंडळाच्या हैदराबाद येथे २८ फेब्रुवारीला होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय होणार असल्याने संदिग्धता अजूनही कायमच आहे.
मराठी प्रकाशक परिषद व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी यांच्यातील बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अरुण जाखडे यांनी आपली भूमिका मांडली. महामंडळाचे प्रकाश पायगुडे, सुनील महाजन, मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष रमेश कुंदूर, कार्यवाह अनिल कुलकर्णी, कोषाध्यक्ष अरविंद पाटकर आणि ग्रंथ विक्रेते रमेश राठीवडेकर उपस्थित होते.
डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, की चर्चेसाठी प्रकाशक परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रकाशक परिषदेने त्यांच्या मागण्यांचे निवेदनपत्र महामंडळाला दिले आहे. महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक २८ फेब्रुवारीला हैदराबाद येथे होणार असून, यामध्ये निर्णय जाहीर केला जाईल. यामुळे प्रकाशक व महामंडळ या वादाला पूर्णविराम मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)