पब, डिस्को अन् लग्नातील लाइटही देईल बुबुळाला दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 08:52 PM2023-10-16T20:52:07+5:302023-10-16T20:52:27+5:30
याप्रमाणेच पब, डिस्को आणि लग्न समारंभाच्या ठिकाणी असलेली प्रकाशयोजनादेखील आपल्या दृष्टीवर परिणाम करते. त्यामुळे यावरही निर्बंध यायला हवेत, असे नेत्रराेगतज्ज्ञांचे मत आहे....
पुणे : प्रखर प्रकाशाचा झोत किंवा रात्रीच्या वेळी वाहनांच्या हेडलाइट्चा झोत आपल्या डोळ्यावर पडला तर कोणाचेही डोळे बंद होतात. डोळे अतिशय नाजूक इंद्रिय असून, ते तीव्र प्रकाश सहन करू शकत नाही. याप्रमाणेच पब, डिस्को आणि लग्न समारंभाच्या ठिकाणी असलेली प्रकाशयोजनादेखील आपल्या दृष्टीवर परिणाम करते. त्यामुळे यावरही निर्बंध यायला हवेत, असे नेत्रराेगतज्ज्ञांचे मत आहे.
सध्या डीजेच्या लेझर लाइटमुळे युवकांची दृष्टी कमी झाल्याचे उदाहरणे आहेत. मात्र, याबराेबरच प्रखर उजेड, रंगीबेरंगी रोषणाई आपल्या डोळ्यांवर काही काळासाठी किंवा दीर्घकालीन परिणाम करू शकते. पब, लग्नसमारंभ, मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि लेझर शोमध्ये विविध प्रकारांतील प्रकाशामुळे अनेक रुग्णांची दृष्टी अंधुक होऊ शकते. याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.
तरुणाई मोठ्या संख्येने पब आणि डिस्कोमध्ये जातात. याठिकाणी चमकणारे दिवे त्यांच्या दृष्टीवर परिणाम करतात आणि हे सहसा लक्षातही येत नाही. डोळ्यातील पडदा, डोळ्यांमधील ऊती, उच्च तरंग असलेल्या लेझर लाइट्समुळे डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असते. पब, डीजे, विवाहसोहळा, विविध कार्यक्रम आणि अगदी लेझर शोसारख्या कार्यक्रमांमुळेही रेटिनाला दुखापत झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, प्रकाश उत्सर्जित करणारे लेझर डोळ्यातील पडद्याच्या लहान भागावर केंद्रित असताना तीव्र उष्णता निर्माण करतात, ज्यामुळे कायमस्वरूपी दृष्टिदोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डोळ्यांची काळजी कशी घ्याल?
- डिस्को, पब, कॉन्सर्ट आणि विवाह सोहळ्यांतील प्रखर दिव्यांकडे सतत पाहू नका आणि अधून-मधून दूरवर नजर फिरवत डोळ्यांना विश्रांती द्या.
- भरपूर पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. डोळे कोरडे होऊ नये याकरिता वारंवार त्यांची उघडझाप करा.
- प्रखर दिव्यांमुळे बहुतेकदा डोळ्यांची उघडझाप फारशी होत नाही. यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा निर्माण होते. या सोप्या डाेळ्यांची उघडझाप केल्याने त्यामध्ये काेरडेपणा येत नाही.
पब, डिस्कोमधील लाइट्स हे चमकदार आणि आकर्षक असले तरीदेखील आपल्या डोळ्यांसाठी मात्र ते हानिकारक ठरतात. यामुळे डोळ्यांवर अनावश्यक ताण येतो. हे प्रखर दिवे आपल्या डोळ्यातील फोटोरिसेप्टर पेशींवर परिणाम करतात आणि पुढे जाऊन अंधत्वास कारणीभूत ठरू शकतात.
- डॉ. वंदना कुलकर्णी, नेत्ररोगतज्ज्ञ