PUC | पीयूसीकडे दुर्लक्ष केल्यास १५०० हजारांचा बसेल फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 11:20 AM2022-03-30T11:20:28+5:302022-03-30T11:23:50+5:30
आरटीओ व वाहतूक पोलिसांना कारवाईचे अधिकार
पुणे : वाहनांतून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांची पीयूसी चाचणी अनिवार्य आहे. वाहन नवीन असेल तर दोन वर्षांनंतर व त्याहून जास्त कालावधी असलेल्या वाहनांची दर सहा महिन्यांनी पीयूसी चाचणी होणे गरजेचे आहे. मात्र अनेक वाहनधारक आपल्या दुचाकी व चारचाकीच्या पीयूसी चाचणीकडे दुर्लक्ष करतात. त्यांचा हा दुर्लक्षपणा पुण्यातील १५६८ वाहनधारकांना महागात पडला आहे. अशा वाहनधारकांकडून जवळपास आठ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे आपणदेखील पीयूसीची चाचणी केली नसेल तर आताच करून घ्या नाहीतर ३५ रुपयाची पीयूसी चाचणी आपणांस दोन हजार रुपयांना पडेल.
आरटीओ व वाहतूक पोलिसांना अधिकार :
वाहनासंदर्भात कारवाई करण्याचे अधिकार आरटीओ व वाहतूक पोलिसांना आहे. वाहने जप्त केल्यानंतर अथवा कारवाईच्या वेळी पीयूसी कागदपत्राची मागणी केली जाते. त्यावेळी जर कागदपत्रे नसेल तर अथवा टेस्ट केलीच नसेल तर संबंधित वाहनांवर दोन हजार रुपयांचा दंड केला जातो.
पीयूसी फी ३५ रुपये :
दर सहा महिन्यांनी दुचाकीची पीयूसी चाचणी केली पाहिजे. याची फी ३५ रुपये आहे. मात्र जर चाचणी केली नसेल अथवा सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असेल तर दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागतो. चारचाकीची फी ९० व ११० इतकी आहे.
मागच्या वर्षी कारवाई किती
१ जानेवारी ते २७ मार्चदरम्यान १५६८ वाहनांवर कारवाई केली आहे. मागच्या वर्षी जवळपास सहा हजार वाहनचालकांवर कारवाई केली. यातून जवळपास १३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.