Puja Khedkar : मनोरमा खेडकरचा पिस्तूल परवाना रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 09:45 IST2024-12-04T09:20:22+5:302024-12-04T09:45:06+5:30
पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे अनेक कारनामे समोर आले होते.

Puja Khedkar : मनोरमा खेडकरचा पिस्तूल परवाना रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
पुणे : मुळशी तालुक्यात जमिनीचा वाद सुरू असताना समोरच्या व्यक्तीला पिस्तूल दाखवून धमकावत असल्याचा मनोरमा खेडकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी मनोरमा खेडकर यांच्या पिस्तुलाचा परवाना रद्द करून खेडकर कुटुंबाला दणका दिला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने मनोरमा खेडकर यांचा पिस्तूल परवाना रद्द करण्याचा पुणे पोलिसांचा निर्णय फेटाळून लावला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खडंपीठासमोर मनोरमा खेडकर यांची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी सांगितले की, पिस्तूल परवाना रद्द करताना पुणे पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नाही. त्यानुसार कायदेशीर त्रुटी आढळल्यामुळे खेडकर यांचा पिस्तूल परवाना रद्द करण्याचा पोलिसांचा निर्णय न्यायालयाने फेटाळला आहे.
मनोरमा खेडकर या सहा महिन्यांपूर्वी सनदी सेवेतून बरखास्त केलेल्या पूजा खेडकर याच्या माताेश्री आहेत. पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे अनेक कारनामे समोर आले होते. त्यातलाच एक म्हणजे जमिनीचा वाद सुरू असताना समोरच्या व्यक्तीला पिस्तूल दाखवत धमकावत असल्याचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला हाेता. त्यानंतर मनोरमा पसार झाल्या होत्या. पोलिसांनी त्यांना रायगड जिल्ह्यातील हिरकणीवाडीतील एका लॉजमधून अटक केली होती.
त्यानंतर मनोरमा खेडकर यांच्यासह त्यांचे पती आणि इतर पाच जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. दरम्यान ऑगस्ट २०२४ मध्ये मुळशी तालुक्यात जायचे नाही, या अटीवर न्यायालयाने मनोरमा खेडकर आणि इतरांना जामीन मंजूर केला होता.