पुजारी टोळीतील गुंडास अटक
By admin | Published: May 4, 2017 02:48 AM2017-05-04T02:48:18+5:302017-05-04T02:48:18+5:30
कुविख्यात रवी पुजारी टोळीतील गुंडाला बेकायदेशीर हत्यारांसह खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक डबल बोअर
पुणे : कुविख्यात रवी पुजारी टोळीतील गुंडाला बेकायदेशीर हत्यारांसह खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक डबल बोअर गावठी कट्टा, एक लोखंडी पिस्टल व एकूण ८ काडतुसे असा ९१ हजार ६०० रुपये किमतीचा माल जप्त केला. आरोपीवर चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसिफ युसूफ खान (वय ३८) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना खंडणीविरोधी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांना रवी पुजारी टोळीतील आणि काही महिन्यांपासून सुरेश पुजारी टोळीसाठी सक्रीय असलेला गुंड बेकायदेशीर शस्त्रांसह चंदननगरच्या झेन्सर कंपनीच्या मोकळ्या जागेत येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने कर्मचाऱ्यांसह सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. हा आरोपी पूर्वी रवी पुजारी टोळीसाठी काम करीत होता. त्याच्यावर नवी मुंबई येथील भूमीराज बिल्डरच्या आॅफिसवर २००८ मध्ये फायरिंग केले होते. त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे (अति. कार्य), सहायक पोलीस निरीक्षक सुनील गवळी, विठ्ठल शेलार आदींनी कारवाई केली. (प्रतिनिधी)
पुण्यातील कोंढवा येथील एकता बिल्डरच्या कार्यालयावर रवी पुजारी याच्या सांगण्यावरून खंडणीसाठी फायरिंग केले होते. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर सुमारे दोन वर्षांपासून तो फरार होता. गेल्या काही महिन्यांपासून रवी पुजारी टोळीपासून वेगळे झाल्यानंतर आपला साथीदार सादीक बंगाली याच्याबरोबर सुरेश पुजारी टोळीसाठी तो काम करीत आहे. या आरोपीवर विविध ठिकाणी खंडणीसह इतर ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.