वाळूचोरीमुळे पुलाला धोका; कारवाई होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 01:55 AM2018-10-31T01:55:58+5:302018-10-31T01:56:16+5:30
राजकीय वरदहस्त असल्याने अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा
रांजणगाव सांडस : नागरगाव (ता. शिरूर) येथील भीमा नदीच्या तीरावर असणारा शिरूर-सातारा रस्त्यावरील पारगाव येथील मुख्य पुलाच्या खाली वाळूचोरांनी उत्खनन चालू केल्याने पूल पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे बोलले जाते.
पारगाव येथील बंधाºयाला पाणी अडविण्यासाठी प्लेट टाकण्याचे काम सुरू असल्याने बंधाºयाच्या विरुद्ध बाजूला पाण्याचा प्रवाह कमी पडलेला आहे. त्यामुळे या भागात कधी नव्हे एवढी वाळू उघडी पडली आहे. या वाळूवर वाळूचोरांची नजर पडलेली असल्याने वाळूचोर हे दिवसा या मुख्य पुलाखाली वाळूउपसा करीत आहेत. बंधारा यापूर्वी पडण्याचा धोका निर्माण झाला होता. आता या पुलाखाली वाळूउपसा सुरू झाल्याने पूल पडतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. प्लेट टाकल्यामुळे या भागात पाणीसाठा हा पात्रात असल्याने वाळूचोरांनी तराफ्याच्या साह्याने वाळूउपसा सुरू केला आहे. महसूल विभागाच्या अधिकाºयांनी याकडे पूर्णपणे डोळेझाक केली आहे. वाळूचोरांना राजकीय अभय असल्याने त्यांना कोणत्याही अधिकाºयाच्या कारवाईची भीती वाटत नाही.
वन विभागाकडूनही कारवाई होत नाही
वाळूचोर हे याच भागातील आहेत. या भागात त्यांची दहशत असल्याने महसूल विभाग त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. वाळूचोर हे वन विभागाच्या हद्दीतून दिवसाढवळ्या वाळू काढत असून वन विभाग त्यांच्यावर कारवाई का करीत नाही? अशी विचारणा होत आहे.
वाळूचोरांवर लवकरच कारवाई केली जाईल. तसेच, त्यांच्याकडून दंडही वसूल केला जाईल.
-रणजित भोसले, तहसीलदार, शिरूर