शहा कुटुंबाला खेचण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:10 AM2021-09-25T04:10:34+5:302021-09-25T04:10:34+5:30
शहा-पाटील यांची दिलजमाई : कर्मयोगीसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज लोकमत न्यूज नेटवर्क कळस : एप्रिल महिन्यामध्ये घरगुती ...
शहा-पाटील यांची दिलजमाई : कर्मयोगीसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
कळस : एप्रिल महिन्यामध्ये घरगुती कारण सांगत भरत शहा यांनी त्यांच्याकडील अर्बन बँक व विविध पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहा कुटुंबासाठी आपल्याकडे खेचण्यासाठी फासे टाकले होते; मात्र आता कर्मयोगीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शहा-पाटील यांच्या आजच्या दिलजमाईने त्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.
शहा यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहा कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिल्याची चर्चा रंगली होती; मात्र आता कर्मयोगीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शहा यांनी राज्यमंत्री भरणे यांचे आमंत्रण नाकारल्याचे संकेत मिळत आहेत.
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचा राजकारणात स्थापनेपासून एकत्र असलेले व मध्यंतरी काहीसा विसंवाद असलेल्या पाटील-शहा कुटुंबात कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा दिलजमाई झाली आहे. इंदापूर तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात शहा कुटुंबाचे मोठे योगदान आहे. कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय माजी खासदार शंकरराव पाटील यांचे निष्ठावान सहकारी कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास शहा यांच्या जोडीगोळीने अनेक वर्षे एकत्र काम केले. तसेच शहा यांची स्नुषा अंकिता शहा या इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत. पुतणे भरत शहा संचालक मंडळावर गेली दहा वर्ष आहेत. त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये विविध पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. हर्षवर्धन पाटील यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे याची सर्वत्र चर्चा झाली होती.
चौकट
शहा यांनी इंदापूर ऊस उत्पादक गटातून निवडणुकीस आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चर्चेला अखेर पूर्णविराम दिला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य माउली चवरे, ॲड. कृष्णाजी यादव उपस्थित होते.