‘पल्स’ गुंतवणूकदारांच्या तक्रारी
By admin | Published: November 22, 2014 12:26 AM2014-11-22T00:26:22+5:302014-11-22T00:26:22+5:30
सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) चौकशी सुरू केलेल्या पल्स कंपनीच्या विविध योजनांमध्ये पुण्यातील गुंतवणूकदारांनीही मोठी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे.
पुणे : सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) चौकशी सुरू केलेल्या पल्स कंपनीच्या विविध योजनांमध्ये पुण्यातील गुंतवणूकदारांनीही मोठी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या पुण्यातील कार्यालयाला कुलूप लावण्यात आलेले असल्यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. आतापर्यंत डेक्कन पोलिसांकडे तब्बल ५० जणांनी तक्रारी दिल्या आहेत.
मोठ्या परताव्याच्या आमिषाने हजारो कोटी रुपयांची माया गोळा करणाऱ्या पर्ल्स अॅग्रोटेक कॉर्पोरेशन लि. (पल्स) या कंपनीने गाशा गुंडाळला आहे. अनेक गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याप्रकरणी सेबीने या कंपनीची चौकशी सुरू केली आहे. करचुकवेगिरी, मनी लाँड्रिंगसह अनेक गैरव्यवहारांच्या चौकशीकरिता सीबीआयने एक समिती नेमली आहे. सेबीने आॅगस्ट २०१४ मध्ये सादर केलेल्या चौकशी अहवालात कंपनीवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे. साखळी पद्धतीने यापुढे पैसे गोळा करण्यास सेबीने कंपनीला प्रतिबंध केला होता. तसेच तीन महिन्यांत गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे आदेशही दिले होते. या मुदतीत पैसे परत न केल्यास संचालक व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला होता. परंतु गुंतवणूकदारांना अद्याप पैसे परत मिळाले नाहीत.
एजंटद्वारेच हजारो कोटी रुपये कंपनीने गोळा केल्यामुळे एजंट्ससहित गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. यातीलच कोल्हापूर व सोलापूर येथील काही एंजट्सनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
पुण्यातील गुंतवणूकदारांनी कंपनीच्या डेक्कन परिसरातील कार्यालयात धाव घेतली. मात्र, कार्यालयाला कुलूप असल्यामुळे शेवटी डेक्कन पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार देण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी या कार्यालयाच्या दरवाजावर नोटीस लावली असून, तक्रार द्यायची असल्यास त्यांनी डेक्कन पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचना नोटीसीमध्ये देण्यात आल्या आहेत.
(प्रतिनिधी)