पुणे महापालिकेची पल्स पोलिओ लसीकरणाची तयारी पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 03:42 PM2019-03-09T15:42:24+5:302019-03-09T16:30:58+5:30
विवार दिनांक १० मार्च २०१९ रोजी शून्य ते ५ वर्ष वयोगटातील बालकांकारिता पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पुणे : महापालिकेची पल्स पोलिओ मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून साडे चार हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ रविवारी शून्य ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना लस देण्यासाठी काम करणार आहे. पालिकेने २ लाख ७४ हजार बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे अतिरीक्त महापालिका आयुक्त (जनरल) रुबल अगरवाल यांनी सांगितले.
रविवार दिनांक १० मार्च २०१९ रोजी शून्य ते ५ वर्ष वयोगटातील बालकांकारिता पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून तयारी सुरु आहे. अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी पालिकेमध्ये यासंदर्भातील बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. यावेळी लसीकरण विभागाचे डॉ. अमित शहा यांनी लसीकरण मोहिमेबाबत करण्यात आलेल्या नियोजनची माहिती दिली.
सर्व मनपा दवाखाने, रुग्णालये, अंगणवाडी, खाजगी दवाखाने इत्यादी ठिकाणी १३२० बुथचे नियोजन करण्यात आले आहे. ३९६० स्वयंसेवक, २८० पर्यवेक्षक, १५ मुख्य पर्यवेक्षक, महापालिकेचे १०० डॉक्टर्स व ५ विभागीय अधिकारी, महापालिकेच्या नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त खाजगी डॉक्टर्स, अंगणवाडी सेविका, रोटेरीयन्स, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी यांचा सहभाग असणार आहे. सर्व एस. टी. स्टँड, रेल्वे स्टेशन, काही उद्याने, सर्व बांधकामाच्या साईटसवर, महामार्ग इत्यादी ठिकाणी विशेष बूथ कार्यरत राहणार आहेत.
याप्रसंगी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. चेतन खाडे यांनीही पल्स पोलिओ मोहिमे संदर्भात माहिती दिली. आरोग्य प्रमुख डॉ.रामचंद्र हंकारे यांनी याप्रसंगी सांगितले कि शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त बालकांना १० मार्च २०१९ रोजी लसीकरण करण्यात येणार असून त्यादृष्टीने सर्व तयारी झालेली आहे. रोटरी क्लबचे डॉ. प्रकाश पाटील यांनीही मोहिम यशस्वी करण्यासाठी नियोजन केले जाईल असे सांगितले. याप्रसंगी परिमंडळ वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
....................
महापालिकेची पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. येत्या रविवारी (१० मार्च ) शहरातील जवळपास २ लाख ७४ हजार बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करून घ्यावे.
- रुबल अगरवाल, अतिरीक्त आयुक्त, महापालिका