Pulwama Attack : काळजाचा ठोका चुकला आणि गहिवरलं सैनिकांचं गाव, गावचे 150 पोरं लष्करात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 12:26 AM2019-02-18T00:26:09+5:302019-02-18T00:26:43+5:30
पिंगोरी येथे वाहण्यात आली शहिदांना श्रद्धांजली : गावातील दिडशे तरुण लष्करात
नीरा : भारतीय जवानांवर गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी माध्यमातून दाखविली गेली. घरोघरी बातमी पाहिली आणि सैनिकांचं गाव असलेल्या पिंगोरीतील लोकांच्या काळजाचा ठोका चुकला आणि अनेकांनी फोन करून आपल्या सैन्यातील जवानाची चौकशी केली. मृत सैनिकांचा आकडा पाहून आख्खं गाव गहिवरला होता. पुरंदर तालुक्यातील १६०० लोकसंख्या असलेल्या पिंगोरी गावत आजही १५० जवान भारतीय सेनेत आहेत. श्रीलंकेतील व कारगिल युद्धाच्या वेळी या गावातील दोन तरुणांना वीरत्व प्राप्त झाले होते. त्यामुळे युद्धाची किंवा सैनातील बातमी आली, की लोकांच्या मनात चिंतेचे काहूर माजते. गावातील लोकांबरोबरच पै पाहुणे व मित्र मंडळीसुद्धा फोन करून आप्तेष्टांची चौकशी करत होते.
या घटनेत गावातील कोणी जवान तर नसेल ना, याची खातरजमा केली जात होती. मृतांचा आकडा मोठा असल्याचे एकूण सर्वजण गहिवरले. काल शनिवारी गावातील शहीद स्मारकापुढे एकत्र येत येथील सेवानिवृत्त सैनिकांनी व तरुणांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी निवृत्त कॅप्टन शामराव शिंदे, महादेव गायकवाड, सेवानिवृत्त शिक्षक नाना गुरुजी, पोलीस पाटील राहुल शिंदे, प्रकाश शिंदे, सोपान शिंदे, महादेव शिंदे, माणिक शिंदे, विश्वजित शिंदे, सागर सुतार यांसह मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते. या वेळी ‘शहीद जवान अमर रहे’, ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या.
४आपल्या देशात अराजकता माजवणे हा शत्रुराष्ट्राचा मोठा उद्देश आहे. त्यासाठी अशा प्रकारचे हल्ले घडवले जातात. सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्याने शत्रुराष्ट्र त्या माध्यमातून अफवा पसरवण्याचा प्रयत्न करेल. तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करत असताना अफवांना बळी पडू नका. अशा प्रकारे कोण अफवा पसरवीत असतील तर पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन पोलीस पाटील राहुल शिंदे यांनी या वेळी केले.