पुनाळेकर, भावे यांना ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 03:23 AM2019-06-02T03:23:55+5:302019-06-02T03:24:33+5:30

लॅपटॉप व मोबाईल जप्त । फॉरेन्सिक लॅबची मदत घेणार

Punalakar and Bhave will be sent to CBI custody till June 4 | पुनाळेकर, भावे यांना ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

पुनाळेकर, भावे यांना ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

Next

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.
तपासादरम्यान सीबीआय ने पुनाळेकर यांच्याकडून दोन मोबाईल व लॅपटॉप जप्त केला आहे. ते पुढे न्यायवैद्यकीय मानसशास्त्रीय विश्लेषणासाठी (फॉरेन्सिक लॅब) पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्या अहवालानुसार चौकशी करायची असल्याने दोघांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी केली. नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना एटीएसने अटक केली होती. चौकशीत या दोघांनी नरेंद्र दाभोलकर हत्येविषयीची माहिती उघड केली. याबाबत सीबीआयने सनातनचे वकील संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक केली. शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एन.सोनवणे यांनी त्यांना १ जुनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. शनिवारी रोट्टे यांच्या न्यायालयाने त्या कोठडीत ४ जुनपर्यंत वाढ केली आहे.

सीबीआयचे विशेष सरकारी वकिल प्रकाश सूर्यवंशी म्हणाले, पुनाळेकर यांनी आरोपीना गुन्ह्यात वापरलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला. हे वकिली नियमांचे उल्लंघन आहे. त्यांच्याकडून मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त केले आहेत. डेटा विश्लेषणाचे काम अद्याप सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची असल्याने विक्रम भावे याच्याकडे सखोल चौकशी करायची आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून त्यात अनेक आरोपींचा समावेश आहे. यामुळे दोघांनाही अतिरिक्त १४ दिवस सीबीआय कोठडी द्यावी.

Web Title: Punalakar and Bhave will be sent to CBI custody till June 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.