नुकसानग्रस्त भागाचे जलदगतीने पंचनामे करा : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 05:35 PM2020-10-15T17:35:57+5:302020-10-15T17:37:45+5:30
अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यात नागरिकांच्या घरांचे व शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे.
कळस : पुणे जिल्ह्यासह इंदापुर तालुक्यात परतीच्या वादळी पावसाने द्राक्षे,डाळिंब, ऊस व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरांचे व शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. यासर्व नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी तालुक्यातील प्रशासनाला दिल्या आहेत.
याबाबत ‘लोकमत’शी बोलताना भरणे यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यासह तालुक्यात बुधवारी झालेल्या पावसामुळे द्राक्षे, डाळिंब, ऊस व फळबागा अडचणीत आले आहेत. भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांचे व जमिनीचे बांध वाहुन गेल्याने नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्ते व पुलांची दुरावस्था झाली आहे. सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र इंदापूर शहर व तालुक्यातील काही भागांची पाहणी केली आहे. यावेळी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पिकांसह घरे व पशुधनाचेही पंचनामे होणार आहेत.
जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाने कार्यवाही चालु केली आहे. नागरिकांनी आपले तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहाय्यक याच्यांशी संपर्क करून या नुकसानग्रस्त नागरिकांनी आपले नुकसानीचे पंचनामे करुन घ्यावेत, कोणीही वंचित राहणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत. सांयकाळ पर्यंत नजर अंदाज आकडेवारी समजेल. अजुनही पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
————————————————
...अतिवृष्टीने दोन्ही घटक कोलमडले
कोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे अगोदरच लहान मोठा शेतकरी,व्यापारी अडचणीत सापडला आहे. त्यातच झालेल्या या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि व्यापारी हे दोन्ही घटक पुरते कोलमडुन गेले आहेत.त्यामुळे विभागीय आयुक्तांनी कोणत्याहि आदेशाची वाट न पाहता.सरसकट पंचनामे करण्याचे आदेश काढावेत,अशी मागणी भाजपचे भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे यांनी केली आहे.
———————————