"पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम" च्या जयघोषात 'ज्ञानोबा' निघाले विठ्ठलाच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 10:36 AM2021-07-19T10:36:48+5:302021-07-19T15:26:16+5:30
आळंदीतून माऊलींच्या चलपादुकांचे पंढरीकडे शाही प्रस्थान
भानुदास पऱ्हाड
आळंदी : ''पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय" अशा जयघोषात तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चांदीच्या चलपादुका घेऊन आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास आजोळघरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले . यापार्श्वभूमीवर शासनाकडून पालखी प्रवासासाठी देण्यात आलेल्या दोन्ही विशेष शिवशाही बसमध्ये निमंत्रीत चाळीस वारकऱ्यांसमवेत पोलीस बंदोबस्तात पंढरीला रवाना झाल्या आहेत.
तत्पूर्वी, आज पहाटे घंटानाद झाल्यानंतर आजोळघरात माऊलींच्या पादुकांना पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे - पाटील, यांच्या हस्ते पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा करण्यात आली. तर प्रमुख ब्रम्हवृंदाच्या हस्ते माउलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख करण्यात आला. सकाळी सातच्या सुमारास माऊलींच्या चलपादुकांसमोर दैनंदिन कीर्तन सेवा पार पडली.
दरम्यान फुलांनी सजविलेल्या दोन्ही विशेष बस पोलीस बंदोबस्तात आजोळ घराबाहेर आणून सज्ज करण्यात आल्या. त्यानंतर निमंत्रित वारकऱ्यांना सॅनिटाईज करून बसमध्ये प्रवेश दिला. सकाळी नऊच्या सुमारास माऊलींचा नैवैद्य दाखवून मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ - मृदुंगाच्या गजरात '"पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री. ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय" अशा जयघोषात सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांनी पादुका हातात घेतल्या.
हरिनामाच्या गजरात माऊलींच्या पादुका बसमध्ये फुलांनी सजविलेल्या पहिल्या खुर्चीवर विराजमान करण्यात आल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, प्रांतधिकारी विक्रांत चव्हाण, सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर आदींच्या हस्ते बसचे विधिवत पूजन करून हा आषाढी बसवारी सोहळा पोलीस बंदोबस्तात आजोळघरापासून नगरपालिका चौकातून इंद्रायणीच्या नवीन पूलमार्गे पंढरीला रवाना झाला.
वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी
यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून हा सोहळा संपन्न होईल. मानाच्या पालख्या विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी होईल.