पुणे : जिल्ह्यात रोज ११ अपघात; ४ मृत्यू, मागील वर्षभरात ४ हजार अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:29 AM2018-01-23T06:29:11+5:302018-01-23T06:29:23+5:30

मागील वर्षभरात दररोज सरासरी अकरा अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. मागील वर्षात जिल्ह्यात सुमारे चार हजार अपघात झाले असून...

Pune: 11 accidents every day; 4 deaths, 4 thousand accidents in the previous year | पुणे : जिल्ह्यात रोज ११ अपघात; ४ मृत्यू, मागील वर्षभरात ४ हजार अपघात

पुणे : जिल्ह्यात रोज ११ अपघात; ४ मृत्यू, मागील वर्षभरात ४ हजार अपघात

Next

पुणे : जिल्ह्यात मागील वर्षभरात दररोज सरासरी अकरा अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. मागील वर्षात जिल्ह्यात सुमारे चार हजार अपघात झाले असून त्यात १३९८ जणांचा बळी गेला आहे. २०१६ या वर्षाच्या तुलनेत अपघातांमध्ये काहीशी वाढ झाली असली तरी मृतांचा आकडा किंचित घटल्याचे दिसते.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मागील तीन वर्षांची अपघातांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीवरून तीन वर्षांत अपघातांमध्ये सातत्य असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मात्र, मृतांचा आकडा कमी झाल्याचे सकारात्मक चित्रही आहे. २०१५ मध्ये पुणे शहर व ग्रामीण भागात अनुक्रमे १४४३ आणि २६३५ असे एकूण ४०७८ एवढे अपघात झाले होते. त्यामध्ये १५४३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. २०१६ मध्ये अपघातांचे प्रमाण काहीसे कमी झाले. पण २०१७ मध्ये त्यातुलनेत वाढ झाली असून सुमारे चार हजार अपघात झाले आहेत. असे असले तरी मृतांचा आकडा घटल्याचे दिसते.
पुणे शहरापेक्षा ग्रामीण भागात अपघातांची संख्या अधिक आहे. मागील वर्षी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये मिळून सुमारे दीड हजार अपघात झाले. त्यात ३७३ जणांचा बळी गेला, तर ग्रामीण भागात सुमारे अडीच हजार अपघातांत १ हजार २५ जणांना आपला जीव गमवावा लागला. मागील तीन वर्षांत एकूण ११ हजार ७९० अपघात झाले असून त्यात ४ हजार ४१२ जणांचा मृत्यू झाला, तर ९ हजार ५८२ लोक जखमी झाले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अपघातांची आकडेवारी मांडण्यात आली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार भीमराव तापकीर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, विनोद सगरे, अनिल वळीव, आनंद पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत रस्ते अपघात कमी करण्यासाठी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
कृती आराखडा : ट्रफिक पार्क उभारण्याची सूचना
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैठकीत प्रत्येक तालुक्यात ट्रॅफिक पार्क उभारण्याची सूचना केली. तसेच स्वतंत्र रस्ता सुरक्षा पथकाची निर्मिती, अपघात कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे, अपघातप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण, महाविद्यालय व शाळास्तरावर रस्ता सुरक्षा स्वयंसेवकांचे जाळे निर्माण करण्याबाबत त्यांना सूचना केल्या.
द्रुतगती महामार्गावरून जाणाºया दुचाकी वाहनांवर कारवाई, तसेच मार्गाच्या जोन्ही बाजूने संरक्षक जाळी लावण्याची सूचना शिरोळे यांनी केली. तसेच त्यांनी खासदार निधीतून आरटीओ ५० लाख रुपयांचा निधी दिला. त्यातून रोलर ब्रेक टेस्टिंग यंत्रणा खरेदी करण्यात येणार असून लहान परिवहन वाहनांचे
योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे करण्यात येणार आहे. महामार्गावरील बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोन तंत्राचा वापर करण्याबाबत साबळे यांनी सुचविले.

Web Title: Pune: 11 accidents every day; 4 deaths, 4 thousand accidents in the previous year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.