Guillain Barre Syndrome: पुणे '१२७'; ‘जीबीएस’च्या १६ रुग्णांची भर, आतापर्यंत दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:07 IST2025-01-30T14:05:28+5:302025-01-30T14:07:01+5:30
बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पोटदुखी, उलटी, जुलाब, अशक्तपणा जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावे

Guillain Barre Syndrome: पुणे '१२७'; ‘जीबीएस’च्या १६ रुग्णांची भर, आतापर्यंत दोघांचा मृत्यू
पुणे: शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोम या नव्या विषाणूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या विषाणूचे आतापर्यंत १२७ संशयित रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात ९ रुग्ण, पुणे महापालिका हद्दीत ९३, पिंपरी - चिंचवड महापालिका हद्दीत १३ आणि इतर जिल्ह्यातील ९ रुग्ण अशा एकूण १२७ रुग्णांवर सध्या पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यापैकी २० रुग्ण अतिदक्षता (व्हेंटीलेटर) विभागात आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
दरम्यान, बुधवारी नव्याने १६ रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी रुग्ण न वाढल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. एकूण रुग्णसंख्येत ० ते ९ आणि १० ते १९ वयोगटातील मुलांची संख्या अधिक म्हणजे १८ इतकी आहे, तर ६० ते ६९ वयोगटातील व्यक्तींची संख्या १० आहे. त्यामुळे नागरिकांनी लहान मुलांसह वृध्द व्यक्तींची (प्रतिकारशक्ती कमी असलेले) विशेष काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पोटदुखी, उलटी, जुलाब, अशक्तपणा जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
गेल्या वर्षांत २० रुग्ण
पुणे शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या गेल्या वर्षभरात जवळपास २० रुग्ण आढळले आहेत. परंतु या काळात उद्रेक नव्हता. सध्या एका महिन्यात या आजाराचे रुग्ण सापडत आहेत, अशी माहिती ससून प्रशासनाकडून देण्यात आली.
वयोगट एकूण संख्या
० ते ९ - २२
१० ते १९ - १८
२० ते २९ - ३०
३० ते ३९ - १६
४० ते ४९ - १३
५० ते ५९ - १८
६० ते ६९ - १०
एकूण १२७