पुण्यात १४ वर्षाच्या शाळकरी मुलीनं ओढणीनं गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 09:59 PM2021-09-15T21:59:04+5:302021-09-15T21:59:12+5:30
गंभीर बाब म्हणजे येरवड्यात एकाच आठवड्यात चार आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत.
येरवडा : शाळकरी मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री येरवड्यात घडली. रिचा दिलीप देवकर (वय 14, रा. चित्रा चौकाजवळ येरवडा) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. रिचाने नेमकी आत्महत्या का केली? याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. गंभीर बाब म्हणजे येरवड्यात एकाच आठवड्यात चार आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कंजारभाट वसाहती समोर चित्रा चौकात एका घराच्या पहिल्या मजल्यावर एका मुलीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली असता रिचा हिने पहिल्या मजल्यावरील खोलीत छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. उपचारासाठी ससून रुग्णालयात नेले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रिचाच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे.
दोन दिवसापूर्वी तिचे आईवडील त्यांच्या गावी गेले होते. भाऊ व ती दोघेच घरी होते. भाऊ घराबाहेर गेल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले. अचानक घडलेल्या या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. रिचाने आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक व परिसरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तिने अचानक आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
येरवडा परिसरात एकाच आठवड्यात आत्महत्येच्या चार घटना
येरवडा परिसरात एकाच आठवड्यात आत्महत्येच्या चार घटना घडलेल्या आहेत. या सर्व आत्महत्या या तीस वर्षाच्या आतील शाळकरी व युवक वर्गातील मुला-मुलींच्या आहेत. वाढती व्यसनाधिनता तसेच संवादाचा अभाव यामुळे आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आत्महत्यांचे वाढते प्रमाण गंभीर असून समाजातील सुजाण नागरिक व सामाजिक संस्था यांनी या गंभीर समस्येवर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.