Pune: बटाट्याच्या पाला खाल्यामुळे विषबाधा, २० गाईंचा मृत्यू; १५ ते २० लाखांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 05:09 PM2023-11-07T17:09:07+5:302023-11-07T17:09:53+5:30
आतापर्यंत १० ते १५ लाखाचे नुकसान झाले असून अजून गाई दगावल्यास त्यांचे ५० ते ६० लाखांचे नुकसान होण्याची शक्यता आहे....
निरगुडसर (पुणे) : बटाट्याचा पाला खाऊन विषबाधा झाल्याने राजस्थानी गाई व्यवसायिकांच्या १६ मोठ्या गाई ४ कालवडी अशा एकूण २० गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. ही घटना निरगुडसर (ता.आंबेगाव) येथे घडली असून अजून ३० ते ४० गायानाहीं विषबाधा झाली आहे. त्यात विषबाधा झालेल्या आणखी काही गाई दगावण्याची शक्यता आहे. आतापर्यंत १० ते १५ लाखाचे नुकसान झाले असून अजून गाई दगावल्यास त्यांचे ५० ते ६० लाखांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
निरगुडसर मेंगडेवाडी हद्दीवरील रस्त्यावर राजस्थान येथून आलेले लालगाई वाले गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे १५० गाई, वासरे आहेत. ते आपला उदरनिर्वाह करण्यासाठी लाल गाई पाळतात. दुग्ध व्यवसाय व शेणखत विक्री करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. तसेच निरगुडसर व आजूबाजूच्या परिसरातील फ्लावरचा पाला, बटाट्याचा पाला, कांद्याची पाथ व शेतकऱ्यांच्या शेतात सोडून दिलेला भाजीपाला, तरकारी ते त्यांचे गायांना खाण्यासाठी घेऊन येत असतात.
दोन दिवसांपूर्वी हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड यांनी थोरांदळे येथील एका शेतकऱ्याचा शेतात कापून ठेवलेला बटाट्याचा पाला गायांना खाण्यासाठी आणला होता. हा पाला खाल्ल्यानंतर त्यांच्या गायांना विषबाधा झाली व २० लहान मोठी जनावरे आतापर्यंत मृत्युमुखी पडली आहेत. तर ३० ते ४० गायाही मरणाच्या दारात आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून गायांवर औषध उपचार सुरु आहेत.