Pune: पुणे जिल्ह्यातील पावसाचा खंड ३५ दिवसांचा, ५४ मंडळामध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू

By नितीन चौधरी | Published: August 31, 2023 03:04 PM2023-08-31T15:04:39+5:302023-08-31T15:06:14+5:30

कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ, राजेश देशमुख यांनी दिले आहेत...

Pune: 35 days rainfall volume in Pune district, survey work underway in 54 circles | Pune: पुणे जिल्ह्यातील पावसाचा खंड ३५ दिवसांचा, ५४ मंडळामध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू

Pune: पुणे जिल्ह्यातील पावसाचा खंड ३५ दिवसांचा, ५४ मंडळामध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू

googlenewsNext

पुणे : जिल्ह्यातील ५४ महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड जवळपास २२ ते तब्बल ३५ दिवसांचा झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे पीक विमा योजनेच्या निकषांनुसार पावसात २१ दिवसांपेक्षा जास्त घट असल्यास व उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईपैकी २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ, राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४५५ मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरी ६८४ मिलिमीटर पावसाच्या तुलनते हा पाऊस केवळ ६७ टक्केच आहे. सर्वांत कमी पाऊस पुरंदर तालुक्यात केवळ ३८ टक्के झाला असून हवेलीत ३९ तर बारामतीत केवळ ४० टक्के झाला आहे. इंदापूर, दौंड शिरूर या तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. पावसाचा खंड एक महिन्यापेक्षा अधिक झाल्याने खरीप पिकांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरीप पिक विमा योजनेच्या निकषांनुसार पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त असल्यास अशा क्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण उत्पादनात ५० टक्के जास्त घट असल्यास त्यांना मिळणाऱ्या पीक विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के नुकसान भरपाई रक्कम आगाऊ दिली जाते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या पीक विमा समितीची बैठक नुकतीच झाली. त्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी काढणार अधिसूचना- 

या बैठकीत जिल्ह्यातील ५४ मंडळांमध्ये पिकांचे सर्वेक्षण सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी दिले. हे सर्वेक्षण करताना पीक विम्यासाठी नोंद झालेल्या १४ पिकांसाठीच हे सर्वेक्षण केले जाणार आहे. एका महसूल मंडळातील ठराविक पीक क्षेत्राची तपासणी ढोबळमानाने केली जाणार आहे. त्यावरून उत्पादनात नेमकी किती घट झाली आहे हे निश्चित केली जाईल तसा अहवाल विमा प्रतिनिधींच्या उपस्थितीत करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी त्यानुसार नुकसान भरपाईसाठीची अधिसूचना जारी करतील. त्यानंतर एकूण नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे.

जिल्ह्यातील ७७ मंडळामध्येही ८० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस आहे. येथेही येत्या काही दिवसांत पाऊस न पडल्यास पिकांची स्थिती बिकट होईल.
- संजय काचोळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे.

 

Web Title: Pune: 35 days rainfall volume in Pune district, survey work underway in 54 circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.