पुणे : अपहरण करून ३५ हजार उकळले ; व्यावसायिकाला शहरातून फिरवले, एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 05:04 AM2017-12-20T05:04:21+5:302017-12-20T05:04:37+5:30
शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ते त्यांच्या कारखान्यात होते. त्या वेळी त्यांच्या दुकानात सहा ते सात जण आले. ‘तुम्ही वाईट दर्जाचे लोणी विकता, आम्हाला तीन लाख रुपये द्या,’ असे ते म्हणाले.
पुणे : दुकानात येऊन व्यावसायिकाकडे तीन लाख रुपयांची मागणी करून धमकी देऊन सात ते आठ जणांनी अपहरण केले. त्यानंतर कात्रज, धनकवडी भागात फिरवून पुन्हा ५० हजार रुपयांची मागणी केली़ त्यानंतर ३५ हजार रुपये घेऊन कारखान्यात सोडून दिले. याप्रकरणी कारचालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
रोहन रामचंद्र साळुंखे (वय ३१,रा़ उरुळी कांचन) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, इतर सात जणांवर कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ४१ वर्षांच्या व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादींचा कोंढवा परिसरात लोणी बनविण्याचा कारखाना आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी अपहरण करण्यासाठी वापरलेल्या कारचालकाला अटक केली. इतर सात जणांपैकी काही जण हे त्याच्या ओळखीचे असून त्यांनी आपल्याला एके ठिकाणी जायचे आहे, असे सांगून नेले आणि पुढे हा प्रकार घडला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
वाईट दर्जाचे लोणी विकता... आम्हाला ३ लाख द्या
शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ते त्यांच्या कारखान्यात होते. त्या वेळी त्यांच्या दुकानात सहा ते सात जण आले. ‘तुम्ही वाईट दर्जाचे लोणी विकता, आम्हाला तीन लाख रुपये द्या,’ असे ते म्हणाले. त्याला फिर्यादींनी नकार दिला़ त्यानंतर कारमध्ये साहेब बसले आहेत. आपल्याला कार्यालयाकडे जायचे आहे, असे सांगून कारमध्ये बसवून कात्रज, धनकवडी परिसरात फिरवले. त्या वेळी कारमध्ये असताना त्यांना आपण हे प्रकरण मिटवून घेऊ, त्यासाठी ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे त्यांना सांगितले. फिर्यादींनी कारखान्यात पैसे आहेत, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी कार कारखान्यात नेली. तेथे गेल्यावर त्यांच्याकडून ३५ हजार रुपये घेऊन कारखान्यात सोडून निघून गेले.