Pune: ३५ वर्षीय मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, वडकीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 12:13 PM2024-04-12T12:13:53+5:302024-04-12T12:14:33+5:30
ही घटना वडकी (ता. हवेली) येथे गुरुवारी(दि.११) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली...
लोणी काळभोर (पुणे) : वडकी येथील ३५ वर्षीय मजुराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना वडकी (ता. हवेली) येथे गुरुवारी(दि.११) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. रवींद्र उर्फ रवी लक्ष्मण पवार असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र उर्फ रवी पवार एक मजूर असून वडकी परिसरात मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रवी पवार हे बुधवारी (दि.१०) रात्री संध्याकाळी बेडरूमचा दरवाजा बंद करून झोपले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.११) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रवी पवार यांच्या पत्नीने त्यांना उठविण्यासाठी दरवाजा वाजवीला मात्र, आतून कोणताही प्रतिसाद नाही आला. त्यांना वाटले की, रवी पवार हे गाढ झोपेत असतील. परंतु सकाळचे अकरा वाजले तरीही रवी पवार उठले नसल्याने, त्यांच्या पत्नी पुन्हा त्यांना आवाज देऊन दरवाजा जोरजोराने वाजवला परंतु तेव्हाही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर त्यांनी शेजारील नागरिकांच्या मदतीने बेडरूमचा दरवाजा तोडला. तेव्हा रवी पवार हे ओढणीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रवी पवार यांना खाली काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
रवी पवार यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. रवी पवार यांनी आत्महत्या का केली? त्या दृष्टीने पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश भोंगळे करीत आहेत.