पुणे : 36 बांगलादेशींना अटक, बनावट कागदपत्रंही जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 10:24 PM2018-05-26T22:24:04+5:302018-05-26T22:24:04+5:30
गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्याच्या विविध भागात बेकायदेशीरपणे राहणा-या ३६ बांगला देशींना पुणे ग्रामीण पोलीस दलाने एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून अटक केली.
पुणे/कुरंकुंभ/दौंड : गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्याच्या विविध भागात बेकायदेशीरपणे राहणा-या ३६ बांगला देशींना पुणे ग्रामीण पोलीस दलाने एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून अटक केली. पुणे ग्रामीण पोलीस दलातील दहशतवाद विरोधी पथक व स्थानिक पोलीस ठाण्याच्या पथकाने ही संयुक्तपणे कारवाई केली. त्यात यवत, दौंड, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर या पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
त्यांच्याकडून बांगला देशीय नागरिकत्वाचा पासपोर्ट, तसेच भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड, तसेच बांगला देशातील जन्माचा दाखला आणि भारतातील जन्माचा बनावट दाखला अशी कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत़ त्यातील अनेक जण गेल्या ३ महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत येथे वास्तव करुन आहेत. प्रामुख्याने ते बौद्ध भंते म्हणून दौंड, कुरकुंभ, यवत, बारामती, वडगाव निंबाळकर येथील बुद्ध विहारात राहत आहे.
ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक सुएज हक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, त्याचे पथक आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
बांगलादेशात सध्या अशांत वातावरण असल्याने हे सर्व जण बेकायदेशीरपणे भारतात आले होते. दौंड, बारामती तालुक्यात एकाच वेळी करण्यात आलेल्या या कारवाईने एक खळबळ उडाली आहे. कुरकुंभ येथे सकाळच्या दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांचे दहशतवादी विरोधी पथक अचानक दाखल झाले. हळूहळू गावात दहशतवादी असल्याची अफवा उठली. त्यामुळे ब-याच जणांनी कुरकुंभ येथील समाज मंदिरात धाव घेतली. पोलिसांनी या परिसरात राहत असणा-या बांगलादेशी नागरिकांना जेरबंद केले होते. अनेक दिवसांपासून बौद्ध भंते येथे राहण्यास येत आहेत. मात्र धार्मिक विधी व प्रशिक्षण होत असल्याने सर्व सामान्य नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ब-याच दिवसापासून हे भंते आपण बिहार येथील बुद्धगया येथून आलेले आहोत, असे सांगत होते. अनेक वेळा बँकेत खाते खोलण्याच्या कारणाने कुरकुंभ येथील रहिवाशी दाखला मिळवण्याचा प्रयत्न देखील संशयीत करीत होते अशी माहिती समोर आली आहे . संशयित भंतेजीना धार्मिक विधि व्यवस्थित येत नसल्याचे देखील बोलले जात आहे.
दौड येथील रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २ वर ३ बांगलादेशी नागरिकांना शनिवारी पकडण्यात आले. रॉनी अजय चौैधरी (वय ३0), सूरजित सुजित रॉय (वय ३३), शीलनंद मागोत्रो (वय ४0) अशी या नागरिकांची नावे आहेत.
बारामती पोलीस ठाण्याचे फौजदार गौड यांनी याबाबत दौड पोलीस ठाण्याला माहिती कळविली, की बारामती येथून तीन बांगलादेशी नागरिक पळाले आहेत. ते रेल्वेने जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार दौंड शहर पोलीस आणि रेल्वे पोलीस यांनी रेल्वे स्थानकात सापळा लावला. त्यानुसार शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमाराला या तिन्ही बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. रेल्वे पोलीस निरीक्षक देवसिंग बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली.