पुणे @ ५.९ अंश सेल्सिअस ; बारा वर्षातील किमान तापमानाचा उच्चांक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 04:27 PM2018-12-29T16:27:27+5:302018-12-29T16:28:48+5:30
गेल्या तीन दिवसांपासून शहरातील किमान तापमानाचा किमान पारा मोठ्या प्रमाणावर घटला असून, शहराला हुडहुडी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुणे : गेल्या तीन दिवसांपासून शहरातील किमान तापमानाचा किमान पारा मोठ्या प्रमाणावर घटला असून, शहराला हुडहुडी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शनिवारी सकाळी किमान तापमानाचा पारा ५.९ अंश सेल्सिअसवर घसरला. गेल्या बारा वर्षांतील किमान तापमानाचा हा उच्चांक ठरला आहे.
उत्तर भारतात शीत लाट पसरली आहे. विदर्भासह मध्यमहाराष्ट्रातही किमान तापमानात गेल्या तीन दिवसांपासून चांगलीच घट नोंदविण्यात येत आहे. शहरात २६ डिसेंबर रोजी किमान तापमानाचा पारा १४ आणि कमाल तापमानाचा पारा ३०.७ अंश सेल्सिअसच्या घरात होता. त्यात सातत्याने घट नोंदविण्यात येत आहे. त्यानंतर २७ डिसेंबरला किमान तापमानात १० अंशापर्यंत आणि कमाल तापमानात २७.७ अंशापर्यंत घट झाली. शुक्रवारी किमान तापमानाचा पारा अणखी ७.४ अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरला. कमाल तापमानही २५.४ अंशांच्या घरात होते.
शनिवारी (दि. २९) पहाटे शुक्रवारच्या ७.४ अंश सेल्सिअसच्या तुलनेत किमान तापमान दीड अंशाने घसरत ५.९ अंशावर स्थिरावले. तर, कमाल तापमानाचा पारा २६ अंश सेल्सिअसवर राहीला. विशेष म्हणजे २८ डिसेंबर २०१७ रोजी शहरातील किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअस तापमान होते. त्यावर्षीच्या हंगामातील ते नीचांकी तापमान ठरले होते. गेल्या तीन दिवसांत किमान आणि कमाल तापमानातही घट होत असल्याने रात्री बोचरी थंडी आणि दिवसा कमालीचा गारठा अशी स्थिती सध्या शहरात पाहायला मिळत आहे. या वर्षाचा समारोप अर्था ३१ डिसेंबरला देखील किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खालीच राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. रविवारी (दि. ३०) ७ आणि सोमवारी (दि. ३१) किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहील, असे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांना २०१८च्या निरोपाचा जल्लोष गारठ्यातच करावा लागेल. शहरातील तापमान १ जानेवारीला १० अंशाच्या घरात असेल. त्यानंतरचे तीन दिवस ११ ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमानाचा पारा राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
---------------
गेल्या १२ वर्षांतील किमान तापमानाची स्थिती
७ डिसेंबर २००७ १०.९
३१ डिसेंबर २००८ ८.६
२५ डिसेंबर २००९ ८.५
२० डिसेंबर २०१० ६.५
२७ डिसेंबर २०११ ७.६
२७ डिसेंबर २०१२ ७.४
१४ डिसेंबर २०१३ ६.८
२९ डिसेंबर २०१४ ७.८
२६ डिसेंबर २०१५ ६.६
११ डिसेंबर २०१६ ८.३
२९ डिसेंबर २०१७ ८.७
२९ डिसेबंर २०१८ ५.९
२७ डिसेंबर १९६८ ३.३