पुणे: ७० लाखांचा गंडा , दहा महिलांची फसवणूक; शेअरबाजारात गुंतवणुकीचे आमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 07:09 AM2018-03-01T07:09:29+5:302018-03-01T07:09:29+5:30
शेअरबाजारात गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेने १० महिलांची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
पुणे : शेअरबाजारात गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेने १० महिलांची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी अनुजा शारंग पांडे (वय ४७, रा़ एरंडवणा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला़
याप्रकरणी सविता पानसरे (वय ४७, रा़ कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे़ ही घटना जानेवारी २०१६ पासून २६ फेब्रुवारी २०१८ दरम्यान घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानसरे या समुपदेशनाचे काम करतात़ त्यांची फेसबुकच्या माध्यमातून २०१५ मध्ये ओळख झाली होती़ त्यांना भांडारकर रोडवरील एका महिलांच्या क्लबची माहिती मिळाली़ पानसरे या त्या क्लबच्या सदस्या झाल्या़ या क्लबमध्येच त्यांची पांडे यांच्याशी ओळख झाली़ त्यांनी आपण शेअर्समध्ये पैसे गुंतविते़ त्यातून मिळणा-या फायद्यातून इतरांना चांगला परतावा देत असल्याचे सांगितले़ त्यांनी त्याबाबत चौकशी केल्यावर क्लबमधील अन्य काही महिलांनीही त्यांचे पैसे गुंतविले असल्याचे त्यांना सांगितले़ त्यानुसार त्यांनी जानेवारी २०१६ मध्ये रोख व चेकद्वारे ३० लाख रुपये पांडे यांच्याकडे शेअर्समध्ये गुंतविण्यासाठी दिले़ सुरुवातीला त्यांनी ठरल्याप्रमाणे काही वेळा गुंतविलेल्या पैशाच्या नफ्यातील रक्कम त्यांना दिली़ त्यानंतर पांडे हिने पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली़ त्यांनी चौकशी केल्यावर त्यांना शेअर मार्केटमध्ये मंदी आहे़ त्यामुळे सध्या पैसे नाहीत, नंतर देते, असे सांगितले़
पानसरे यांनी काही दिवस वाट पाहिल्यानंतरही त्यांनी पैसे न दिल्याने त्यांनी त्यांच्याकडे आपले गुंतविलेले पैसे परत मागितले़ तेव्हा पांडे हिने त्यांना पुढील तारखेचे चेक दिले़ त्यांनी त्या तारखेला बँकेत चेक भरल्यावर पांडे हिने स्टॉप पेमेंट करण्यास बँकेला सांगितल्याची माहिती मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ पानसरे यांच्याप्रमाणेच अनेक महिलांना हाच अनुभव आल्याने त्यांनी बुधवारी पोलिसांकडे धाव घेतली़ आतापर्यंत १० महिलांनी आपली फसवणूक झाली असल्याच्या तक्रारी दिल्या असून त्यानुसार किमान ७० लाख रुपयांचा अपहार झाल्याचे आतापर्यंत उघडकीस आले आहे़ पांडे यांच्याकडे गुंतवणुकीसाठी दिलेल्या अनेक महिलांना त्याची अद्याप माहिती झाली नसून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे़ पोलीस उपनिरीक्षक एस़ डी़ जाधव अधिक तपास करीत आहेत़