Pune: नोकरीच्या आमिषाने ९ जणांना ४१ लाखांचा गंडा, पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Published: May 11, 2024 05:29 PM2024-05-11T17:29:06+5:302024-05-11T17:29:22+5:30
पुणे : कोल इंडियामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ९ जणांना ४१ लाख १८ हजारांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर ...
पुणे : कोल इंडियामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ९ जणांना ४१ लाख १८ हजारांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, खडकी पोलिसांनी, धनंजय लक्ष्मण कारखानीस, तुषार धनंजय कारखानीस, रोहित धनंजय कारखानीस यांच्यासह अन्य दोघे अशा पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संदीप बबन इंदलकर (५१, रा. रघुकूलनगरी, औंध रोड, खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२१ ते मे २०२३ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंदलकर आणि आरोपी कारखानीस हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सुरुवातीला धनंजय आणि तुषार या दोघांनी रोहित याला नोकरी लावण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगून इंदलकर यांच्याकडून १ लाख ८७ हजार रुपये घेतले. मात्र त्यांनी ते पैसे मुदतीत परत केले नाहीत. दरम्यान, ऑगस्ट २०२१ मध्ये कोल इंडियात कोविडमुळे जागा रिकाम्या झाल्या असून, त्या भरायच्या आहेत. तुमच्या मुलीला तेथे नोकरी लावतो असे सांगून इंदलकर यांच्याकडून १६ लाख ६३ हजार रुपये घेतले.
त्यानंतर रोहित याने इंदलकर यांच्या मुलीचे रजिस्ट्रेशन करायचे आहे असे सांगून हाताचे ठसे कोर्या कागदावर घेतले. अशाच प्रकारे आरोपींनी इंदलकर यांच्यासह ९ जणांना कोल इंडियात नोकरीला लावतो म्हणून ४१ लाख १८ हजार ५०० रुपये घेतल्याचे पुढे आले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, विमानाची तिकीटे, राहण्यासाठी अशा विविध बहाण्याने है पैसे घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान जेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले तेव्हा इंदलकर यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिघावकर यांनी सांगितले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे करत आहेत.