Pune coronavirus vaccine : लस मिळेना म्हणून रुग्णालयाने जाहीर केले महापालिका अधिकाऱ्यांचे फोन नंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:26 PM2021-04-13T12:26:17+5:302021-04-13T12:28:56+5:30
पुण्यातील रुग्णालयात बोर्ड लावत अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचे आवाहन. सतत येणाऱ्या फोन नी अधिकारी वैतागले.
पुण्यामध्ये लस मिळेना म्हणून एका रुग्णालयाने चक्क महापालिकेच्या डॅाक्टर अधिकाऱ्यांचेच फोन नंबर जाहीर केले आहेत. इथून नंबर घेवुन नागरिकांचे जवळपास २०० फोन आल्यामुळे महापालिकेचे अधिकारी प्रचंड वैतागले आहेत. वैतागलेल्या अधिकाऱ्यांनी या संबंधित रुग्णालया विरोधात अखेर तक्रार केली आहे.
पुण्यामध्ये लसीच्या उपलब्धतेचा प्रश्न गेले काही दिवस सातत्याने भेडसावतोय. पुरेशा लसी उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णालयांवर लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आली आहे. नागरिक मात्र सातत्याने रुग्णालयांमध्ये चकरा मारत आहेत.
या सगळ्या प्रकाराला वैतागून अखेर पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात चक्क अधिकऱ्यांचेच फोन नंबर जाहीर करण्यात आले. कोथरुड मधल्या या रुग्णालयात “ या केंद्रावर आत्ता लस उपलब्ध नाहीये. सरकार आणि महापालिकेकडुन लस मिळत नसल्याने लसीकरण बंद आहे. अधिक चौकशी साठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा “असा बोर्ड लावण्यात आला होता. या बोर्डवर या संबंधित अधिकाऱ्यांची नावे आणि फोन नंबर जाहीर करण्यात आले होते.
याचा परिणाम असा झाला की या अधिकाऱ्यांना सातत्याने फोन यायला सुरुवात झाली. वैतागलेल्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळी या प्रकाराचा शोध घेतला तेव्हा या बोर्ड मुळे हे फोन सुरु झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधत या प्रकाराची चौकशी केली. दरम्यान वरिष्ठांकडे संपर्क साधत कारवाईची देखील मागणी केली.
या प्रकाराबाबत महापालिकेचा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या की "संबंधित रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केली असून त्यांना असा प्रकार करू नये असे समजावले आहे. दरम्यान अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तसेही जाहीर केलेले असतातच."